30.3 C
Latur
Monday, February 24, 2025
Homeमहाराष्ट्रछत्रपतींच्या जयघोषात दुमदुमली किल्लेशिवनेरी!

छत्रपतींच्या जयघोषात दुमदुमली किल्लेशिवनेरी!

शिवजन्मोत्सव साजरा...

पुणे : छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले हे आपला ठेवा असून तो जपण्याचा प्रयत्न नक्की करू. पहिल्या टप्प्यात शिवाजी महाराजांशी संबंधित विविध २० पर्यटन स्थळे विकसित होत आहेत, त्यात किल्ले रायगडाप्रमाणेच शिवनेरीचाही विकास करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाराष्ट्राची अस्मिता, स्वाभिमान आणि आराध्यदैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आज ३९४ वी जयंती आहे. किल्ले शिवनेरीवर आयोजित शिवजन्मोत्सव सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके यांच्यासह इतर नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी वास्तुकला, अभियांत्रिकी, किल्ल्यावरील प्रत्येक थेंब पाण्याचा उपयोग करून घेण्याची दूरदृष्टी त्या काळी दाखवली. शिवछत्रपती म्हणजे पराक्रम, शौर्य, त्याग, समर्पण आणि दूरदृष्टी असलेले नेतृत्व होते. ते सर्वव्यापी होते आणि त्यांनी सर्वांना बरोबर घेऊन काम केले. ते युगपुरुष, युगप्रवर्तक आणि रयतेचे राजे होते. अठरापगड जातीचे, धर्माचे लोक त्यांनी एकत्र आणले. प्रजेच्या दु:खापुढे, कल्याणापुढे स्वत:चे दु:ख, आराम कवडीमोल मानला. त्यांनी तलवार हाती घेतली पण निष्पापांच्या रक्ताने रंगू दिली नाही. त्यामुळे त्यांच्या तलवारीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो. ते केवळ व्यक्ती नाही तर विचार होते.

शिवरायांकडील एक तरी गुण आपण सर्वांनी घेतल्यास शिवजयंती साजरी करताना त्यांना हेच खरे अभिवादन ठरेल. त्यामुळे समाज, राज्य, देश आणि माणूस म्हणून आपण अधिक प्रगती करू, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
मध्यंतरी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील नौदलाच्या कार्यक्रमात त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण केले तसेच नौदलाच्या ध्वजावर शिवप्रतीमेला समाविष्ट केले ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे. कुपवाडा येथे भारत पाकिस्तान सीमेवर लष्करी जवानांनी शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला. आर्ग्याला देखील दिवाण-ए- आम येथे शिवाजी महाराजांची जयंती गतवर्षीपासून साजरा करतो, असेही त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकोट किल्ले जागतिक वारसा स्थळामध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रधानमंत्री यांनी शिफारस केली आहे. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब आहे. जुन्नर हा पर्यटन तालुका असून बिबट सफारी विकसित करण्याचे घोषित केले आहे. येथील सुकाळवेढे, बोरघर, डूचकेवाडी, खेतेपठार मार्गे शिवजन्म भूमी आणि भीमाशंकर ही तीर्थक्षेत्रे जोडण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.

निसर्ग चक्रीवादळ ग्रस्तांना नुकसान भरपाईची घोषणा
निसर्ग चक्रीवादळामुळे हिरडा पिकाचे झालेल्या नुकसान भरपाईचे १५ कोटी रुपये विशेष बाब म्हणून देण्याची घोषणा मुख्यमंर्त्यांनी करतानाच उपोषणकर्त्यांना उपोषण सोडण्याचे आवाहन केले.

मुख्यमंत्र्यांनी शिवरायांच्या कार्यकुशलतेचे कौतुक करताना म्हटले की, छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते, तेवढेच व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला.
छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही, त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शिवाजी महाराजांनी अन्यायाच्या विरोधात लढायला शिकवले. अन्याय करणारा कितीही मोठा असो देव देश आणि धर्मासाठी लढणारा जिंकतो. आम्हीही शिवाजी महाराजांच्या पावलावर पाऊल टाकून राज्यकारभार करण्याचा प्रयत्न करतोय. पुरातत्व विभागाच्या कामांच्या पद्धतीमुळेच गड किल्यांच्या विकासाला अडथळा येतो. मात्र, यामधे बदल करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री अजित पवार भाषणात म्हणाले की, शिवाजी महाराज म्हणजे सर्वांना एकत्र घेऊन जाणारा विचार. सर्व जाती, धर्मांना एकत्र करून गुलामगिरीच्या विरोधात लढले पाहिजे हे शिवाजी महाराजांनी लोकांच्या मनावर बिंबवले. महायुती सरकार गड-किल्ल्यांसाठी काम करतेय. गडासाठी ८३ कोटी खर्च करण्यात आलेत. याबरोबरच इतर गडकिल्ल्यांच्या जिर्णोद्धार करण्याचे काम करण्याची सूचना मला मुख्यमंत्र्यांनी केले आहे. या भागातील आदिवासी समाजाला हीरडा पिकाच्या नुकसानीची भरपाई मिळावी, असे अजित पवार यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR