25 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रमुख्यमंत्री आणि ठाकरे भेटीत ‘राज’?

मुख्यमंत्री आणि ठाकरे भेटीत ‘राज’?

भेटीतून चर्चेला उधाण अमित ठाकरेंना विधान परिषदेवर घेणार?

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. पुढच्या काळात नियोजित असलेल्या मुंबई महानगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी भाजपाच्या राज्यातील विजयावर शंका उपस्थित करत केलेली टीका यामुळे ही भेट महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

सोमवारी सकाळी ९.३० च्या सुमारास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या दादरमधील शिवतीर्थ या निवासस्थानी गेले होते. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते मोहित कंबोज उपस्थित होते. तर शिवतीर्थावर फडणवीस यांच्या स्वागतावेळी बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि नितीन सरदेसाई हे मनसेचे नेते उपस्थित होते. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये काही वेळ चर्चा झाली.

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेली भेट ही अनौपचारिक भेट असल्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले आहे. तर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील ही भेट राजकीय भेट नसल्याची मनसेचे नेते योगेश चिले यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. ज्यावेळी राजकीय टीका करायची तेव्हा राज ठाकरे ती करत असतात. तसेच वैयक्तिक संबंध सांभाळायचे असतात तेव्हा राज ठाकरे ते सांभाळत असतात. त्यामुळे या भेटीमधून काही वेगळे अर्थ काढण्याची सध्यातरी आवश्यकता नाही, असेही योगेश चिले यांनी सांगितले.

चर्चा फक्त तुम्ही करता : फडणवीस
अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच या भेटीचे गुपित विचारण्यात आले असता, त्यांनी थेट उत्तर दिले. चर्चा फक्त तुम्ही करता, ही कुठलीही राजकीय भेट नव्हती. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर राज ठाकरेंचा मला अभिनंदनाचा फोन आला होता, त्यावेळेस मी त्यांना सांगितले होते, मी घरी येईन. त्यामुळेच आज मी त्यांच्या घरी गेलो होतो, त्यांना भेटून गप्पा मारल्या, नाश्ता केला. आणि मग तिथून मी निघालो. आमच्या या भेटीचा किंवा बैठकीचा कुठलाही राजकीय संदर्भ नाही. केवळ मैत्रीकरता मी त्यांच्या घरी गेलो होतो असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

शिवाजी पार्कात कॅफे उघडला : संजय राऊत
राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे. तिथे लोक चहापाणी करायला येतात, असे संजय राऊत म्हणाले. चांगला चहा असेल तर लोक येत असतात, असेही संजय राऊतांनी म्हटले.

राज ठाकरेंचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपला : अंधारे
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे यांच्या भेटीवर टीका केली. राज ठाकरे यांचा पॉलिटिकल रिलेव्हन्स संपत चाललेला आहे. त्यामुळे राज ठाकरे काय बोलतात आणि त्यांच्याकडे कोण जाते. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात फार काही उलथापालथ होणार नाही असे सुषमा अंधारे म्हणाल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR