16.5 C
Latur
Monday, November 25, 2024
Homeमहाराष्ट्रभाजपचाच मुख्यमंत्री?, मुख्यमंत्री शिंदे नाराज

भाजपचाच मुख्यमंत्री?, मुख्यमंत्री शिंदे नाराज

मुंबई : प्रतिनिधी
विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर महायुतीत मुख्यमंत्रिपद भाजपलाच जाणार असल्याचे जवळपास स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत. आपली नाराजी त्यांनी पक्षाच्या आमदारांपर्यंत पोहोचवलेली आहे. संध्याकाळनंतरच्या सगळ््या गाठीभेटी त्यांनी रद्द केल्या. वर्षावर पोहोचलेल्या शिवसेनेच्या आमदारांदेखील शिंदे भेटलेले नाहीत.

मुख्यमंत्रिपद जाणार असल्याने शिंदेंचे आमदारदेखील नाराज झाले. महायुतीला शिंदेंच्या नेतृत्त्वात विधानसभेत नेत्रदीपक यश मिळाल्याने मुख्यमंत्रिपद त्यांच्याकडे ठेवण्यात यावे, अशी शिवसेना आमदारांची आग्रही मागणी होती. पण ती पूर्ण होताना दिसत नाही. पुढचा मुख्यमंत्री भाजपचाच असणार, यावर जवळपास शिक्कामोर्तब झालेले आहे. त्यामुळे शिंदे नाराज झाले आहेत.

मुख्यमंत्रिपदी कायम राहण्यासाठी एकनाथ शिंदे गेल्या ३६ तासांपासून भाजपच्या नेतृत्त्वाशी वाटाघाटी करत होते. भाजपने १३२ जागा जिंकल्याने आमदार, नेत्यांचा मुख्यमंत्रिपदासाठी दबाव वाढलेला आहे. मागील ५ वर्षे सर्वाधिक आमदार असलेला पक्ष असूनही भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही. त्यामुळे आता मुख्यमंत्रिपद सोडू नये, अशी राज्य भाजपमधील नेत्यांची भूमिका आहे. त्यांच्या भावना समजून घेत पक्षाने मुख्यमंत्रिपद न सोडण्याची ठाम भूमिका घेतली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज झाले आहेत.

संध्याकाळी दिल्लीतून मेसेज आल्यानंतर एकनाथ शिंदेंनी त्यांचे सगळे नियोजित कार्यक्रम रद्द केले. संध्याकाळनंतरच्या त्यांच्या सगळ््या गाठीभेटी रद्द करण्यात आल्या. वर्षावर पोहोचलेल्या स्वपक्षीय आमदारांनादेखील ते भेटलेले नाहीत. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना प्रचंड आग्रही आहे. त्यासाठी शिंदे निकाल लागल्यापासून भाजप नेतृत्त्वाशी बोलत होते तर आज शिवसेनेचे अनेक आमदार, माजी मंत्री सागर बंगल्यावर देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचले. पण या सगळ््याचा शिवसेनेला फायदा होताना दिसत नाही. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेते, हे पाहावे लागेल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR