मुंबई : विशेष प्रतिनिधी
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार, कोणत्या पक्षाचा होणार यावर सध्या कुणीही भाष्य करत नाही. मात्र, राज ठाकरे यांनी २०२४ चा मुख्यमंत्री भाजपचाच होईल, असे म्हटले आहे. याशिवाय २०२९ चा मुख्यमंत्री हा मनसेचा होईल, असे भाकितही राज यांनी वर्तविले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. तसेच, राजकीय वर्तुळात राज ठाकरेंच्या या विधानाने बॉम्ब टाकल्याचंही दिसून येत आहे.
विधानसभा निवडणुकांमध्ये यंदा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यात थेट लढत होत आहे. मात्र, तिसरी आघाडी, मनसे आणि वंचित बहुजन आघाडी हे देखील पूर्ण ताकदीने मैदानात उतरले आहेत. मनसेनंही १०० पेक्षा अधिक जागांवर आपले उमेदवार उभे केले असून यंदा ‘एकला चलो रे’ चा नारा दिला आहे. त्यामुळे, यंदाच्या निवडणुकीतील निकालाची सर्वांनाच उत्सुकता आहे.
एकाअर्थी राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता असल्याचे सूचक विधान केलं आहे. तसेच, मनसेच्या पाठिंब्यावरच हा भाजपचा मुख्यमंत्री होईल, असेही राज यांनी म्हटले.
दरम्यान, राज ठाकरे म्हणाले की, अमित विरोधात माहीममध्ये उमेदवार देणे हा, प्रत्येकाचा स्वभावाचा भाग झाला आहे. प्रत्येकजण आपल्या स्वभावानुसार वागत असतो. भाजपसारख्या मॅच्युअर्ड पक्षांना ही गोष्ट कळू शकते, सगळ्यांनाच हे कळेल असं नाही. बाकी प्रत्येकाचे मिळेल ते ओरबाडण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आपण कोणाला कुठे आणि किती सांगायला जाणार, असे राज ठाकरे यांनी म्हटले.
राज्यात गत ५ वर्षात झालेल्या पक्ष फोडाफोडीच्या घटनेवरही राज यांनी परखड भाष्य केलं. शिवसेनेतून बाहेर पडलो, त्यावेळी मी पक्ष फोडला नाही, असे राज ठाकरे म्हणाले. मग मला सत्तेत येण्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल. मला अशाप्रकारे फोडाफोडी करुन कधीही सत्ता नको, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.
कोणत्या बहिणीने, शेतक-याने फुकट काही मागितले नाही…
लोकांना फुकटची सवय लावून आपण लाचार करत आहोत. तरूणांच्या हाताला कामं देणं हे सरकारचं काम आहे. शेतक-याने सुद्धा वीज फुकट मागितलेली नाही. वीजेमध्ये सातत्य द्या, नीट द्या, थोडी कमी भावात द्या, कोणत्याही बहिणीने फुकट काही मागितलेलं नाही. फुकटचा पैसा महिना, दोन महिना पुरेल, पण महाराष्ट्र कंगाल होईल. राज्यावर १ लाख कोटींवर कर्ज होईल, अगोदरची कर्ज फिटलेली नाहीत, अशा शब्दात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फटकारले आहे.