पुणे : बारामती तालुक्यातील ब-हाणपूर येथे नव्याने निर्मित पोलिस उपमुख्यालयाचे तसेच अन्य विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. विद्या प्रतिष्ठान येथील मैदानावर आयोजित या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ.नीलम गो-हे,ज्येष्ठ नेते तथा खासदार शरद पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, आमदार दत्तात्रय भरणे आदी उपस्थित होते.
बारामतीचा विकासाचा ‘पॅटर्न’ केवळ राज्यातच नव्हे तर देशभरात पोहोचविण्यासारखे असे भव्य पोलिस उपमुख्यालय उभारण्यात आले आहे. ब-हाणपूर या गावाच्या हद्दीत ६५ एकराच्या प्रशस्त परिसरात हे उपमुख्यालय बांधण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात १५ हजार ६५९ चौ. मी.च्या जोत्यावर ३२ हजार ७८५ चौ. मीटरमध्ये प्रशासकीय इमारत, पोलिस अधीक्षक निवासस्थान, उपअधीक्षक निवासस्थान, सायबर पोलीस ठाणे, विश्रामगृह, आर.पी.आय. इमारत, प्रशिक्षण केंद्र, बहुद्देशीय सभागृह, मुलांचे वसतिगृह, मुलींचे वसतिगृह, पोलीस अधिकारी कर्मचा-यांसाठीची निवासस्थाने, पोलिस मोटार ट्रान्सपोर्ट कार्यशाळा या इमारतींचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे.
याशिवाय दुस-या टप्प्यात ४ हजार ८०२ चौ. मीटर बांधकाम क्षेत्रावरील कामे प्रगतीपथावर असून यात क्लब हाऊस, जलतरण तलाव, इन डोअर शूंिटग रेंज, उपहारगृह, शॉपिंग सेंटर, खेळाच्या मैदानात बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेनिस लॉन, फुटबॉल मैदान, रनिंग ट्रॅक अशा सर्व मूलभूत आणि आधुनिक गरजेच्या सोई-सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या एकूण प्रकल्पाचा खर्च १४२ कोटी ६२ लाख रुपये आहे.
वास्तुकलेचा सुंदर नमुना असलेले बारामती बसस्थानक
मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते बारामती येथील बसस्थानकाचेही उद्घाटन करण्यात आले. बसस्थानक, आगार व निवासस्थानाची पुनर्बांधणी करण्यात आली असून बसस्थानकाचा संपूर्ण परिसर सुंदर आणि कल्पकतेने उभारला आहे. जागेचे एकूण क्षेत्रफळ २४ हजार ७४८ चौ.मी. आहे. यामध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर बस स्थानक कार्यालय, तळमजल्यावर आगार आणि पार्सल कक्ष असे बांधकाम करण्यात आलेले आहे. बसेस उभे राहण्यासाठी २२ फलाट उभारण्यात आले असून तळमजल्यावर २२ दुकाने आणि पहिल्या मजल्यावर २१ कार्यालये, १२३ आसनी परिसंवाद कक्ष, ३६ आसनी बैठक व्यवस्था आणि ३२ आसनी शयनकक्ष आहेत.
या बसस्थानकात ६५ बस, ४७ चारचाकी, ४० अॅटोरिक्षा आणि ११७ दुचाकी वाहनाकरीता वाहनतळाची निर्मिती करण्यात येत आहे. परिसराचे बा सुशोभिकरण,फर्निचर तसेच प्रवाशांकरीता सूचना व दिशादर्शक फलक बसविण्यात येत आहे. बारामती शहराच्या वैभवात या बसस्थानकामुळे भर पडली आहे.
बारामती अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटन
बारामती येथे अपर अधीक्षक कार्यालयाचे उद्घाटनदेखील यावेळी करण्यात आले. वाहतूक शाखा आणि शहर पोलीस ठाणे यांच्याकरीता नवीन प्रशासकीय इमारतीचे एकूण १४ हजार ६२ चौ.मी. क्षेत्रफळात बांधकाम करण्यात आले आले. या कामाकरीता आतापर्यंत २७ कोटी ७७ लाख रुपये खर्च आला आहे.
बारामतीच्या सौंदर्यात भर घालणारी पोलिस वसाहत
बारामती येथे पोलीस कर्मचा-यांसाठी १०० वर्षापूर्वीच्या जुन्या बैठ्या दगडी ७५ निवासी खोल्या होत्या. त्या मोडखळीस आल्यामुळे तेथे ७ मजली ७ इमारती मूलभुत सोयीसुविधांसह बांधण्यात आल्या आहेत. त्याचा फायदा १९६ पोलीस कुटुंबियांना होणार आहे. ही निवासस्थाने बैठकीची खोली, स्वयंपाकघर, दोन शयनगृहे आदी सुविधांसह आहेत.
याशिवाय इंदापूर तालुक्यात वालचंदनगर येथे श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गात पोलीस ठाण्याची इमारत गेल्यामुळे तेथे नव्याने पोलीस ठाण्याची सुसज्ज इमारत आणि पोलीस अधिका-यांसाठी ४ अधिकारी निवासस्थाने बांधण्यात आली आहेत. या सर्व कामावर ७५ कोटी ४४ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे. या वसाहतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले.
जिल्हा ग्रामीण पोलीस दलासाठीच्या वाहनांचे लोकार्पण
गृह विभागाच्या विवक्षित प्रयोजनासाठी योजना अंतर्गत जिल्हा नियोजन समितीकडून पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस दलाकरीता ३१ बोलेरो, ७ स्कॉर्पिओ,१ मराझो अशी एकूण ३९ वाहने खरेदी करण्यात आली आहेत. ‘डायल ११२’ प्रकल्पासाठी, नवीन पोलिस ठाण्यांसाठी एस्कॉर्ट, पायलट वाहन तसेच जुनी वाहने निर्लेखित करुन त्याबदल्यात नवीन वाहने अशी ही ३९ वाहने घेण्यात आली असून त्यांचेही लोकार्पण आज करण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात वाहनांचे लोकार्पण करण्यात आले.
अपर पोलीस अधीक्षक कार्यालयात उभारण्यात येणा-या सीसीटीव्ही यंत्रणेच्या कामाचा शुभारंभदेखील यावेळी करण्यात आले. कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात पोलीस शिपाई श्रीकांत गोसावी, पोलिस हवालदार विश्वास मोरे तसेच जयश्री गवळी यांना सदनिकेचे वाटप करण्यात आले. पोलिस विभागाला चारचाकी आणि दुचाकी वाहनाचे पोलीस निरीक्षक प्रेमदिन माने यांना प्रातिनिधिक स्वरूपात या वाहनांची चावी देऊन वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या आयुक्त निधी चौधरी, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे महाव्यवस्थापक मनोज कुसेकर, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, क्रीडा आयुक्त डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे,विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण आदी उपस्थित होते.