नागपूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रेशीमबागेत जाऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. हेडगेवार यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन केले. त्यानंतर हेडगेवार यांच्या दर्शनाने ऊर्जा आणि प्रेरणा मिळते, अशी प्रतिक्रियाही मुख्यमंत्री शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
आमचे सरकार सर्वसामान्य माणसाचे सरकार आहे. सर्वसामान्य माणूस कधीही मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो, असे आमचे सरकार आहे. जनतेच्या सेवेची प्रेरणा येथून घेऊन काम करत आहोत. देशाला काय देणार, हा विचार डॉ. हेडगेवार यांनी दिला, असेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.
दरम्यान, रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृतिभवन परिसराला भेट देताना त्यांच्याबरोबर शिवसेना (शिंदे गट) आमदार भरत गोगावले यांच्यासह अनेक नेते होते. तत्पूर्वी भाजपच्या सर्व आमदारांनी रेशीमबागेत जाऊन स्मृती मंदिर परिसरात डॉ. हेडगेवार आणि गोळवलकर गुरुजी यांच्या समाधीचे दर्शन घेतले.