मुंबई : बीड जिल्ह्यातील केजमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाला तीन आठवडे होत आले तरी सातपैकी तीन आरोपी अजूनही फरार आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज बीडमध्ये सर्वपक्षीय नेत्यांकडून मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला जिल्ह्यातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहत आपला आक्रोश व्यक्त केला. त्यानंतर आता सरकार दरबारी कारवाईला वेग आला असून बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सीआयडीला दिले आहेत.
संतोष देशमुख यांची हत्या केल्यानंतर तीन जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी चौथा आरोपी पोलिसांच्या हाती लागला. मात्र अजूनही तीन जण फरार आहेत. महाराष्ट्रभर संताप व्यक्त केला जात असताना आरोपींना अजून अटक होत नसल्याने पोलिस प्रशासन आणि गृहखात्यावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर आता राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कठोर पाऊल उचलले असून फरार आरोपींची मालमत्ता जप्त करण्याची कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे समजते.
दरम्यान, बीडमध्ये जवळपास १२०० लोकांना शस्त्र परवाना देण्यात आला असल्याने जिल्ह्यात अनेकदा गोळीबाराच्या घटना घडत आहेत. हवेत गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्नही अनेकांकडून होत असल्याचे व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. अशा स्टंटबाजांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करून शस्त्र जमा करावेत, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.