29.6 C
Latur
Tuesday, April 1, 2025
Homeमहाराष्ट्रवडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही

वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही

मोदींच्या उत्तराधिका-यांवरून मुख्यमंत्र्यांचे प्रत्त्युत्तर

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी निवडण्याची वेळ अद्याप आली नसल्याचे ठणकावून सांगितले आहे. आमच्यासह संपूर्ण देश २०२९ चे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याकडे पाहतो. त्यामुळे त्यांच्या उत्तराधिका-यावर आता बोलण्यात अर्थ नाही. वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नसतो असेही ते म्हणाले.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नागपूर दौ-यावर निशाणा साधत ते आपला राजीनामा देण्यासाठी संघ मुख्यालयात गेल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकारणात एकच खळबळ माजली आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरील टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, मोदीजी आमचे नेते आहेत. ते अजून बरेच वर्षे काम करणार आहेत. त्यांच्याकडे आमच्या सर्वांचा आग्रह आहे. आमच्यासह संपूर्ण देश त्यांच्याकडे २०२९ चे पंतप्रधान म्हणून पाहतो. त्यामुळे आता अशी चर्चा करणे योग्य होणार नाही. भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही. तो विचार करायचाही नसतो. वडील जिवंत असताना मुले असा विचार करतात ही मुघलांची संस्कृती आहे. त्यामुळे आत्ता कुणाचाही व कुठेही उत्तराधिकारी निवडण्याची वेळ आली नाही किंवा तसा प्रश्नही उपस्थित होत नाही. माझा त्याच्याशी काही संबंधही नाही.

औरंगजेबाच्या कबरीचे संरक्षण, सरकारची जबाबदारी
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या शौर्याचे प्रतीक असल्यामुळे ती अबाधित ठेवण्याची मागणी केली आहे. याविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, या प्रकरणी सरकारची भूमिका अत्यंत स्पष्ट आहे. सदर कबर एएसआय संरक्षित आहे. त्यामुळे आम्हाला औरंगजेब आवडण्याचा किंवा न आवडण्याचा प्रश्न नाही. या कबरीला कायद्याने ५०-६० वर्षांपूर्वी संरक्षण मिळाले आहे. त्यामु्ळे या प्रकरणी कायद्याने तिचे संरक्षण करणे आमची जबाबदारी आहे. पण हे मात्र निश्चित आहे की, कुठल्याही परिस्थितीत आम्ही औरंगजेबाच्या कबरीने ग्लोरिफिकेशन अर्थात उदात्तीकरण होऊ देणार नाही.

कुंभमेळ्यात भाविकांना स्वच्छ पाणी
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी महाराष्ट्रातील नद्या स्वच्छ करण्यावर आपला भर असल्याचेही स्पष्ट केले. ते म्हणाले, निश्चितपणे महाराष्ट्रातील नद्या या निर्मळ झाल्या पाहिजेत. त्या अविरल झाल्या पाहिजेत असा आमचा प्रयत्न आहे. या प्रकरणी सरकारने एक मिशन हाती घेतले आहे. पण हे काही लगेच होणारे काम नाही. कारण, सर्वच महापालिका, नगरपालिका व ग्राम पंचायतीच्या सांडपाण्याची प्रक्रिया करावी लागेल. तसेच उद्योगांच्याही पाण्याचे प्रक्रिया करावी लागेल. वेगवेगळ्या नाल्यांचे पाणी ट्रॅप करून त्यावर प्रक्रिया करावी लागते. हा खूप मोठा कार्यक्रम आहे. थोडा वेळ खाणारा व काहीसा खर्चिक कार्यक्रम आहे, पण तो केलाच पाहिजे असे आमचे मत असल्याचे फडणवीस म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR