कुर्डुवाडी : आपले लग्नापूर्वीचे प्रेम सासू-सासऱ्याना कधी ना कधी समजेल म्हणून स्वतः ही आत्महत्या करायची व लहान मुलालाही भविष्यात त्रास होऊ नये म्हणून त्यालाही संपवायचे या हेतूने हा खून केल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपी महिलेला डॉक्टरांनी फिटनेस सर्टिफिकेट दिल्यानंतर पोलिसांनी अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले असता महिलेने खून केल्याचे कबूल केले.
कव्हे (ता. माढा) येथील पालखी मार्गावर बोगद्याजवळील चोपडे कुटुंबीयातील एका सहा वर्षीय मुलाचा त्याच्या आईनेच कुऱ्हाडीने शीर छाटून खून करून त्यानंतर स्वतः ही तणनाशक औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना दि. २६ फेब्रुवारी रोजी घडली होती. प्रणव चोपडे (वय ६) असे मृत बाळाचे नाव आहे. मृत बाळाचे आजोबा नारायण चोपडे यांनी फिर्याद दिली होती. मुलाची आईविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता. मुलाचा खून करून तिने स्वतः ही गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो अयशस्वी झाला. त्यामुळे तिने लागलीच दीड ग्लास तणनाशक औषधाचे प्राशन केले वआत्महत्येचा प्रयत्न केला,
यात ती बेशुद्ध अवस्थेत पडली होती. त्यानंतर तिच्यावर कुर्डुवाडी येथील खासगी दवाखान्यात व सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात आले. डॉक्टरांनी फिटनेस सर्टिफिकेट दिल्यानंतर पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अटक केली होती. घटनेच्या दिवशी प्रथम टीव्ही पाहतो काय म्हणून लहान मुलाचा गळा आवळला, नंतर तो मेला की नाही याची खात्री करण्यासाठी त्याला हलवून पाहिले; परंतु आपण आत्महत्या केल्यानंतर मुलगा नाहीच मेला तर? असा विचार करून तिने कुऱ्हाडीने त्याचे शीर धडावेगळे केल्याचे समोर आले आहे.