नंदुरबार : प्रतिनिधी
मिरचीचे आगार समजल्या जाणा-या नंदुरबार जिल्ह्यात यंदा उत्पादन घटल्याने बाजार समितीत ७० टक्क्यांनी आवक कमी झाली आहे. परिणामी, लाल तिखटाचे भाव वाढण्याची शक्यता आहे.
मिरची सुकवून प्रक्रिया केल्यानंतर तिची लाल भुकटी बाजारात विक्रीसाठी आणली जाते. नंदुरबार बाजार समितीमध्ये सप्टेंबर महिन्याच्या दुस-या आठवड्यापासून मिरचीची आवक सुरू झाली. जवळपास तीन महिन्यांत आतापर्यंत ४५ ते ५० हजार क्विंटल आवक झाली आहे.
प्रारंभी ओल्या लाल मिरचीला २५०० ते चार हजार रुपये असा भाव मिळाला. सध्या तीन हजार ते ५१०० रुपये असा भाव मिळत आहे. जेमतेम दीड महिन्याचा हंगाम बाकी असून उर्वरित दिवसांत ५० हजार क्विंटल आवक होण्याचा अंदाज आहे.