बीजिंग : भारतात वंदे भारत आणि अमृत भारतसारख्या वेगवान ट्रेन सुरू झाल्या आहेत. पण, आपला शेजारील देश चीन सुपरसॉनिक ट्रेन तयार करतोय. ही ट्रेन ताशी १००० किलोमीटर वेगाने धावू शकते. चीनने याची चाचणीदेखील यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. या ट्रेनला अल्ट्रा हाय-स्पीड मॅग्नेटिक लेव्हिटेशन (मॅगलेव्ह) ट्रेन म्हटले जात आहे. ही ट्रेन एका लांब पाइपलाइनच्या आत चालवली जाईल.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चायना एरोस्पेस सायन्स अँड इंडस्ट्री कॉर्पोरेशन लिमिटेडने या मॅगलेव्ह ट्रेनची चाचणी शांसी येथील चाचणी क्षेत्रात केली. येथे दोन किलोमीटर लांबीच्या पाइपलाइनमध्ये व्हॅक्यूम तयार करून ट्रेन चालवण्यात आली. भविष्यात हांगझोऊ आणि शांघाय, या दोन शहरादरम्यान ही ट्रेन सुरू करण्याची योजना आहे.
सुपरकंडक्टिंग मॅगलेव्ह चाचणी लाइन तयार
उत्तर चीनमधील शांसी प्रांतातील दातोंग शहरात या ट्रेनसाठी सुपरकंडक्टिंग मॅगलेव्ह चाचणी लाइन तयार करण्यात आली आहे. कॅशीक शास्त्रज्ञ ली पिंग म्हणाले की, सध्या या ट्रेनच्या प्राथमिक चाचण्या सुरू आहेत. ट्रेनची रचना, वेग, नेव्हिगेशन आदींची चाचणी झाली. बहुतांश चाचण्यांमध्ये यश आले आहे. सर्व चाचण्या झाल्यानंतर हांगझोऊ आणि शांघाय दरम्यान ट्रेन सुरू केली जाईल.
ट्रेनचा वेग ताशी १००० किलोमीटर
सध्या ६२३ किलोमीटर प्रतितास या वेगाने चाचणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, व्हॅक्यूम निर्माण न करता ही गती प्राप्त झाली आहे. व्हॅक्यूम तयार केल्यानंतर ट्रेनचा वेग ताशी १००० किलोमीटर होईल. सध्या चीनमध्ये धावणा-या हायस्पीड बुलेट ट्रेनचा कमाल वेग ताशी ३५० किलोमीटर आहे.