बीजिंग : चीनच्या सैन्यात गेल्या तीन वर्षांत असा बदल झाला आहे, जो देशाच्या इतिहासात यापूर्वी कधीही पाहिला गेला नाही. राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी गेल्या तीन वर्षांत ३० हून अधिक जनरल आणि अॅडमिरलना एकतर बडतर्फ केले आहे किंवा ते अचानक गायब झाले आहेत.
जिनपिंग यांनी २०२३ मध्ये जी सेंट्रल मिलिटरी कमिशन स्थापन केली होती, त्यातही फक्त एक जनरल शिल्लक राहिले आहेत. बडतर्फ केलेल्यांमध्ये टॉप जनरल झांग यूक्सिया यांचाही समावेश आहे. त्यांची जबाबदारी सैन्याला युद्धासाठी तयार करण्याची होती. यापैकी अनेकांवर भ्रष्टाचाराचा आरोप आहे. मात्र, जाणकारांनुसार ही मोहीम जिनपिंग यांची निष्ठा निश्चित करण्याचीही प्रक्रिया आहे.
झांग यूक्सिया यांच्यासोबतच जनरल लियू झेनली यांनाही हटवण्यात आले आहे. २०२३ च्या सुरुवातीला चीनकडे ३० जनरल आणि अॅडमिरल होते जे विशेष विभाग आणि थिएटर कमांड्स चालवत होते. आता केवळ सात जनरलच सक्रिय भूमिकेत शिल्लक राहिलेले दिसत आहेत. सेंट्रल मिलिटरी कमिशन मध्ये आता फक्त एकच जनरल आहेत. झांग शेंगमीन. जिनपिंग यांच्या लष्करी स्वच्छता मोहिमांवर तेच लक्ष ठेवत आहेत. ही स्वच्छता मोहीम शी जिनपिंग यांची ताकद दर्शवते.
झांग शेंगमीन यांच्या कारकिर्दीचा मोठा भाग रॉकेट फोर्समध्ये भ्रष्टाचारविरोधी आणि राजकीय शिस्तीच्या देखरेखीमध्ये गेला आहे, जी चीनच्या अणु आणि पारंपरिक क्षेपणास्त्र कार्यक्रमांवर नियंत्रण ठेवते. शी यांनी त्यांना गेल्या वर्षी सीएमसीचे उपाध्यक्ष बनवले होते. जनरल झांग आणि कमांडर लियू झेनली यांना हटवल्यामुळे, जे नेते थेट सैन्याला युद्धासाठी तयार करण्याची जबाबदारी सांभाळत होते, ते आता बाहेर पडले आहेत. अशा परिस्थितीत, या प्रक्रियेमुळे जगातील दुस-या सर्वात शक्तिशाली सैन्याच्या शीर्षस्थानी मोठी पोकळी निर्माण झाली आहे. यामुळे शी जिनपिंग यांचा पीपल्स लिबरेशन आर्मीवरील विश्वास काही काळासाठी कमी होऊ शकतो.

