थिंपू : सन २०१७ मध्ये भारत आणि चीनमधील डोकलाम वादाच्या वेळी, पश्चिम भूतानजवळील सिलीगुडी कॉरिडॉर हे एक महत्त्वाचे धोरणात्मक स्थान म्हणून उदयास आले होते. २० वर्षांनंतर चीन आता भूतानच्या उत्तरेकडील भागांवर लक्ष ठेवून आहे. भूतानच्या उत्तरेकडील भागांजवळ चीन वेगाने पायाभूत सुविधांचा विकास करत असल्याचे सॅटेलाइट इमेजमधून समोर आले आहे.
जकारलुंग खोरे आगामी काळात चीनच्या ताब्यात जाऊ शकते. ब्रिटनच्या थिंक टँक चॅथम हाऊसने (रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल अफेयर्स) हा खुलासा केला आहे. अहवालानुसार, मोठ्या सवलतीचा एक भाग म्हणून, भूतान जकारलुंग आणि शेजारच्या मेनचुमा खो-यातील चीनच्या ताब्यातील जमीन सुपूर्द करेल. भूतानच्या बेयुल खो-यात चीनने रस्त्यांचे जाळे विणले आहे. अनेक लष्करी चौक्याही बांधण्यात आल्या आहेत. या भागातील बहुतेक लोक तिबेटी बौद्ध धर्माचे पालन करतात. चीनने यापूर्वीही भूतानच्या भागात रस्ते बांधण्याचा प्रयत्न केला होता.
तथापि, हे बहुतेक पश्चिम भूतानमध्ये घडत होते. २०१७ मध्ये चीनने दक्षिण-पश्चिम डोकलाममध्ये रस्ता बांधण्याचा प्रयत्न केला. येथे त्यांची भारतीय जवानांशी चकमक झाली. अहवालानुसार, भूतान चीनच्या शक्तीपुढे गुडघे टेकताना दिसत आहे. भूतान व्यवहार तज्ञ तेनंिझग लामसांग म्हणतात की भूतान चीनच्या कृतीवर मौन बाळगण्याची आपली जुनी रणनीती कायम ठेवेल. त्यांच्या मते, भूतान हा दोन मोठ्या शक्तींच्या (भारत-चीन) मध्ये अडकलेला देश आहे.
चीन-भूतान सीमा निश्चित करणार
बेयुल व्यतिरिक्त भूतानच्या मेनचुमा व्हॅलीमध्येही चिनी बांधकाम दिसून आले आहे. २०२१ मध्ये काही काळ चीनने या खो-यावर कब्जा केल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, भूतानच्या रॉयल आर्मीने याचा इन्कार केला आहे. बेयुल आणि मेनचुमा येथेही चिनी लिबरेशन आर्मी स्टेशन आहेत. भूतानचे परराष्ट्र मंत्री तांडी दोरजी यांनी बींिजगमध्ये चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांची भेट घेतली. या अंतर्गत दोन्ही देशांनी आपापल्या सीमा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे.
तीन देशांमधील वाद
वर्षाच्या सुरुवातीला शेजारील देश भूतानचे पंतप्रधान लोटे थेरिंग यांनी डोकलाम क्षेत्रावरील वादाला तीन देशांमधील वाद असल्याचे म्हटले होते. ते म्हणाले की, डोकलाम वाद भारत, चीन आणि भूतान यांनी संयुक्तपणे सोडवला पाहिजे, कारण या वादात तिन्ही देश तितकेच जबाबदार आणि भागधारक आहेत.