नाशिक : भारताने पाकिस्तानच्या दहशतवादी कृत्याला प्रभावी उत्तर दिले आहे. सध्या या दोन्ही देशांत युद्धसदृश्य स्थिती आहे. यावेळी प्रत्येक नागरिक देखील त्यामध्ये जबाबदारीने आपले योगदान देऊ शकतो.
माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी पहेलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांची हत्या झाली होती, त्याला प्रखर उत्तर भारतीय सैन्याने दिल्याचे सांगितले. ती काही दिवस भारतीय सीमांवर आणि देशातील विविध भागात पाकिस्तानच्या आगळीकीने जागरूकता कायम ठेवावी लागेल. या परिस्थितीत केंद्र शासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी अतिशय चांगली कामगिरी करीत आहे.
काँग्रेससह सर्व विरोधी पक्ष त्यांच्या मागे खंबीरपणे उभे आहेत. केंद्र सरकार आणि भारतीय सैन्याच्या प्रत्येक कृतीला विरोधी पक्षांनी मनापासून आणि जोरदार पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे सध्या तरी भारतापुढे अडचणी दिसत नाहीत असेही भुजबळ म्हणाले. भारताने पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी ठिकाणांवर हल्ले केले. भारतीय सैन्याने अतिशय प्रखर आणि जबाबदारीने ही कारवाई केली. केवळ दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यात आले. त्याविषयी भारतीय सैन्याकडून देखील स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
मात्र पाकिस्तान हा सातत्याने दहशतवाद्यांच्या पाठीशी उभा राहत आला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी त्याची प्रचिती दिली आहे. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या कृत्यांच्या समर्थनासाठी आणि त्यांना पाठराखंड करण्यासाठी भारताविरोधात कारवाया करीत आहे. अमेरिकेसह विविध देशांनी पाकिस्तानला समज देण्याचा प्रयत्न केला आहे. भारतीय सैन्याच्या दहशतवादी स्थळांवरील कारवाईला प्रत्युत्तर देऊ नये, असे अमेरिकेने स्पष्ट सांगितले होते. पाकिस्तानने त्या विरोधात कारवाई केली आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानला धडा शिकविण्यास सक्षम आहे असे भुजबळ म्हणाले.
या स्थितीत भारतीय नागरिक देखील आपली कर्तव्य आणि जबाबदा-या योग्य प्रकारे पार पाडून आपले योगदान देऊ शकते. जिथे काम करीत असो तिथे प्रभावीपणे आणि मनापासून काम करून उत्पादकता वाढवली पाहिजे. भारतीय सैन्याला अनेक प्रकारचा पुरवठा करावा लागतो. त्यासाठी नागरिकांचे हे योगदान महत्त्वाचे ठरेल.