तुळजापूर : येथील तुळजा भवानी मंदिरामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये आणि मंदिरातील सुरक्षा रक्षकांमध्ये धक्काबुक्कीची घटना झाली आहे. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोदारातील मंदिराचे शिखर उतरण्याला जितेंद्र आव्हाड यांचा विरोध आहे, त्याच अनुषंगाने आव्हाड यांनी मंदिराला भेट देत पाहणी करून, देवीचे दर्शन घेऊन आपली भूमिका मांडली. यावेळी ही धक्काबुक्की झाली.
जितेंद्र आव्हाड यांच्या भूमिकेनंतर भाजपकडूनही त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत रास्ता रोको आंदोलन करण्यात आले, आव्हाड यांना पुढे न जाऊ देण्याचा इशारा भाजप कार्यकर्त्यांना दिला. त्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर परिसरात पोलिस बंदोबस्त वाढवला होता. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोदारातील मंदिराचे शिखर उतरण्यात येणार आहे. याला आमदार जितेंद्र आव्हाड यांनी विरोध केला.
त्याच अनुषंगाने आव्हाड यांनी मंदिराला भेट देत पाहणी करुन, देवीचे दर्शन घेऊन आपली भूमिका मांडली. जितेंद्र आव्हाड मंदिरात दाखल झाल्यानंतर राजे शहाजी महाद्वारातून त्यांनी पाहणी केली. त्यानंतर, मदिरात प्रवेश केल्यानंतर त्यांचे कार्यकर्ते आणि सुरक्षारक्षक यांच्यात गोंधळ उडाला. आव्हाड यांना मंदीरात सोडलेल्या ठिकाणाहूनच आम्हालाही आत सोडण्यात यावे असे म्हणत मंदिरात जाण्यासाठी कार्यकर्ते व पदाधिकारी यांची गर्दी झाली होती.
यावेळी मंदिरातील सुरक्षारक्षक व आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची देखील झाली होती, विशेष म्हणजे आ. आव्हाड मंदिरात पाहणी करत असल्याने भाविकांची दर्शन लाईन थांबवली, त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. दुसरीकडे भाजप कार्यकर्ते आणि जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थक कार्यकर्त्यांमध्येही धक्काबुकी झाल्याने तुळजाभवानी मंदिरासमोर प्रचंड गोंधळ उडाला होता, काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

