मानवत : तालुक्यातील हत्तलवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक व्ही. पी. लाड हे मानवत तहसील येथे निवडणूक विभागात प्रतिनियुक्तीवर असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यामुळे संतप्त विद्यार्थ्यांनी सोमवार, दि. १५ रोजी मानवत तहसील कार्यालयात चक्क वर्ग भरवला. प्रशासनाने संबंधीत शिक्षकांना निवडणूक कामातून कार्यमुक्त करण्याचे आश्वासन दिल्यानंतर विद्यार्थी व पालक शांत झाले.
मानवत तालुक्यातील हत्तलवाडी येथे जिल्हा परिषदेचे १ली ते ८वी पर्यंत वर्ग आहेत. गावातील शेतकरी, शेतमजूर पालकांचे विद्यार्थी व विशेषत: विद्यार्थिनी शिक्षण घेतात. मात्र शाळेतील शिक्षक व्ही. पी. लाड हे २०१९ पासून निवडणुक विभागात प्रतिनियुक्तीवर आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची तक्रार पालकांनी प्रशासनाकडे केली होती. तसेच मानवत तहसील कार्यालयात शाळा भरवण्याचा इशाराही दिला होता. हत्तलवाडी येथील पालक विद्यार्थ्यांसह सोमवारी मानवत तहसील कार्यालयात आले व त्यांनी वर्ग भरवला. अखेर प्रशासनाने पालक, विद्यार्थ्यांची मागणी मान्य करून संबंधित शिक्षकाला निवडणूक कामातून कार्यमुक्त कारण्याचे मान्य केले. त्यानंतर विद्यार्थी व पालकांनी समाधान व्यक्त केले.
या संदर्भात पालकांनी निवेदन दिले असून व्ही.पी. लाड हे २०१९ पासून केवळ ३ ते ४ महिनेच शाळेत आले. तसेच हत्तलवाडी या गावातील बी.एल.ओ. असतानाही ते गावात फिरकले सुद्धा नाहीत. या मुळे गावक-यांनी संताप व्यक्त केला.