परभणी : परभणी येथील स्वराज्य ट्रॅकर्सच्या सदस्यांसह अन्य गिर्यारोहकांनी उत्तराखंड राज्यातील हिमालयाच्या रांगेतील १२ हजार ८०० फूट उंचावरील ब्रह्मताल आणि तुंगनाथ ही दोन शिखरे यशस्वीपणे सर केली. यावेळी गिर्यारोहकांनी भारत माता की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा देत पर्यावरण वाचवण्याचा संदेश फडकवून स्वच्छता जनजागृतीचा संदेश दिला.
सदरील मोहिमेस परभणी येथून दि. २८ जानेवारी रोजी १७ गिर्यारोहकांचा समूह रवाना झाला होता. ३१ जानेवारी रोजी उत्तराखंड राज्यातील चमौली जिल्ह्यातील लोहजंग बेस कॅम्पपासून सकाळी ७ वाजता मोहिमेस सुरुवात झाली. भेकलताल, झेंडी टॉप तसेच ब्रह्मताल असे सलग तीन दिवस गिर्यारोहण करीत २ फेब्रुवारी रोजी समुद्रसपाटीपासून १२८०० फूट उंचीवर असलेले ब्रम्हताल शिखर सर केले. या मोहिमेनंतर ४ फेब्रुवारी रोजी गिर्यारोहकांनी तुंगनाथ शिखर यशस्वीपणे सर करीत बर्फवृष्टीचा आनंद ही लुटला. सदरील शिखर समुद्रसपाटीपासून ११९५० फुट उंचीवर आहे. या दोन्हीही शिखरांवर उणे ५ ते १० तापमान होते. खडतर चढाई, कमी होत जाणारा ऑक्सिजन, प्रचंड थंडीत मोहीम यशस्वी पूर्ण केल्याबद्दल या गिर्यारोहकांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
सदरील गिर्यारोहणाची मोहीम परभणीतील गिर्यारोहक रणजित कारेगावकर यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आली होती. या मोहिमेत अजय मलकुनायक, माधव यादव, महेंद्र मोताफळे, किरण रोपळेकर, डॉ.जयंत बोबडे, रवी रेड्डी, दयानंद जमशेटे, विष्णू मेहत्रे, गणेश यादव, महेश मोकरे, अभिजित मेटे, उमेश फुलपगार, नारायण रेवणवार, प्रसाद सूर्यवंशी, गुलाब गरुड, नितीन काळे आदींचा सहभाग होता.