19.4 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रपरभणी घटनेच्या निषेधार्थ बंद

परभणी घटनेच्या निषेधार्थ बंद

अंबाजोगाई- कळंब राज्य महामार्ग अडवला मुंबईसह नांदेड, लातूरमध्येही बंद

मुंबई : प्रतिनिधी
परभणी येथील घटनेचे पडसाद ठिकठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहेत. महाराष्ट्र बंदचे आवाहन केल्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे. या घटनेच्या निषेधार्थ मुंबईसह बीड, नांदेड, लातूर, धाराशिव, छ. संभाजीनगर, यवतमाळमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला असून याला व्यापा-यांकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.

दरम्यान बीडच्या अंबाजोगाई तालुक्यात नागरिक आक्रमक झाले आहेत. अंबाजोगाई- कळंब महामार्गावरील दिघोळ अंबा येथे महामार्ग आडवत ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.
परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या समोरील संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. तर पोलिसांच्या कस्टडीत असलेल्या कार्यकर्त्याचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटत असल्याचे पाहण्यास मिळत आहे.

प्रामुख्याने बीड जिल्ह्यात नागरिक आक्रमक झाले असून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार बंद पाडण्यात येत आहे. तर मुंबईमध्ये देखील परभणी घटनेचे पडसाद उमटत असून दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

मुंबईत आंबेडकरी अनुयायी ताब्यात
मुंबईतील चेंबूरमधील आंदोलकांना आंबेडकरी अनुयायांनी ताब्यात घेतले आहे. महाराष्ट्र बंदची हाक दिल्यानतंर चेंबूरमध्ये आंबेडकरी अनुयायांचे आंदोलन सुरु होते. यानंतर पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतले. तसेच दहिसरमध्ये आरपीआय आठवले पक्षातर्फे मुंबई बंदची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे दहिसरमध्ये दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत.

बीडमध्ये रास्ता रोकोने वाहतूक खोळंबली
परभणी येथील न्यायालयीन कोठडीत झालेले युवकाचे मृत्यू प्रकरण आणि बीडच्या मस्साजोग येथील संतोष देशमुख हत्या प्रकरण या दोन्ही घटनेच्या निषेधार्थ डिघोळ अंबा येथील गामस्थांकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने मागण्याचे निवेदन देण्यात आले. दरम्यान यावेळी वाहनांच्या दोन्ही बाजुंनी रांगा लागल्या होत्या.

लातूरमध्ये सकाळपासूनच कडकडीत बंद
लातूर शहरात कडकडीत बंद पाडण्यात आले आहे. यावेळी शहरातील आंबेडकरी व संविधानवादी पक्ष-संघटनाच्या वतीने बंदचे आवाहन करण्यात आलं आहे. शाळा, महाविद्यालय, व्यापारी संकुल बंद करत व्यापा-यांनी देखील प्रतिसाद दिला. तर कुठलाही अनुचित प्रकार घडू नये. यासाठी पोलिसांनी मोठा फौज फाटा देखील तैनात केला आहे.

नांदेड बंदला चांगला प्रतिसाद
परभणी येथे सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचे न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाल्यानंतर आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. नांदेडमध्ये देखील या बंदला सकाळपासूनच चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड शहरासह जिल्ह्यातील तालुक्यात देखील या बंदला व्यापा-यांनी प्रतिसाद देत आपली दुकाने बंद ठेवली आहेत. बंदच्या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्ह्यात मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

यवतमाळ मध्ये निषेधार्थ बंद
परभणीच्या घटनच्या निषेधार्थ संविधान प्रेमी रस्त्यावर उतरले असून त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिस कोठडीत झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ आर्णी येथील बाजारपेठ बंद आहे. तर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने शहरात तगडा पोलिस बंदोबस्त तैनात असून दंगल नियंत्रण पथक, राखीव पोलिस दल शहरात दाखल झाले आहे.

धाराशिवमध्ये निषेध आंदोलन
धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहर या घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद ठेवण्यात येणार आहे. आंबेडकर अनुयायी संघटनेकडून शहरातील बससेवा, शाळा, महाविद्यालये सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आल्या आहेत. उमरगा येथील आंबेडकर आनुयायी संघटनेच्या वतीने प्रशासनाला निषेधांचे निवेदन देखील देण्यात येणार आहे.

सोलापूरात माथाडी कामगारांकडून निषेध
परभणी प्रकरणाचे पडसाद सोलापूरातही उमटताना दिसत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीतील माथाडी कामगारांकडून निषेध आंदोलन करण्यात येत आहे. न्यायालयीन कोठडीत मृत झालेल्या सूर्यवंशीला न्याय द्या या मागणीसाठी आंदोलन केले जात आहे.

घाटी रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त
परभणीतील आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहाचे छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. आज दुपारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी बाळासाहेब आंबेडकर अंत्यविधीसाठी उपस्थित राहणार आहेत. सध्या घाटी रुग्णालयाबाहेर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. यामुळे घाटी रुग्णालयात पोलिसांचा तगडा बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR