धाराशिव : प्रतिनिधी
चालत्या तीन ट्रक मधून लाखो रूपये किंमतीचे नवीन कपडे चोरट्यांनी लंपास केले. चोरीची ही घटना छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर मलकापूर ते येडशी दरम्यान घडली. या प्रकरणी येरमाळा पोलिस ठाणे येथे दि. १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर धाराशिव जिल्ह्याच्या हद्दीत चालत्या वाहनातून साहित्य लंपास होण्याच्या घटना वाढल्या आहेत. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहेत. फिर्यादी दिनेश शिवराज गवशेट्टी हे संभाजीनगर ते सोलापूर असे ट्रक घेऊन जात होते. त्यांच्या ट्रकमध्ये कपड्याचा माल भरलेला होता. मलकापूर ते येडशी रोडवर ट्रक मधील लेडीज ड्रेस मटेरियल अंदाजे ५४ हजार ५०९ रूपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी चालत्या ट्रक मधून लंपास केले.
दुस-या ट्रक मधील लेडीज ड्रेस मअेरियल अंदाजे १० हजार २३८ रूपये किंमतीचे लंपास केले. तिस-या ट्रक मधून पुरुषाचे शर्ट, शिगारेट, सोनपापडी, लेडीज शर्ट, छत्रीच्या काड्या असा एकूण २ लाख ९ हजार ३१५ रूपये किंमतीचा माल चोरट्यांनी ट्रकवर चढून ताडपत्र्या फाडून चोरुन नेला. या प्रकरणी दिनेश गवशेट्टी यांनी दि.१७ जानेवारी रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाणे येथे कलम ३७९ भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.