नागपूर : मागील आठवडाभरापासून उष्ण लाटांच्या प्रखर उन्हापासून त्रस्त झालेल्या विदर्भातील नागरिकांना आकाशात दाटलेल्या ढगांनी मोठा दिलासा दिला. आकाश व्यापलेल्या ढगांनी सूर्यकिरणांची वाट रोखली आणि नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटले. उन्हाच्या चटक्यांपासून दिलासा मिळाला, पण वातावरणातील उष्ण वारे शरीराला झोंबत राहिले.
मागील संपूर्ण आठवडा वैदर्भीयांसाठी तापदायक गेला. चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अकोला शहरांचा पारा ४५ पार जात जागतिक उष्ण शहरांच्या यादीत पोहचला होता. नागपूरसह इतर शहरेही ४४ ते ४५ अंशाच्या दरम्यान पोहचली होती. विदर्भात मुक्कामी असल्यासारखा सूर्याने उन्हाचा कहर केला. तापदायक वातावरणामुळे नागरिकांना प्रचंड हाल सहन करावे लागले.
दरम्यान हवामान विभागाने २७ एप्रिलपासून पुन्हा अवकाळीची स्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तविला होता. या अंदाजाच्या एक दिवसाच्या अगोदरच ढगाळ वातावरण तयार झाले. शनिवारी सकाळी उन्ह तापले होते, पण दुपार होईपर्यंत वातावरण बदलत गेले आणि आकाशात ढगांची गर्दी झाली. या ढगांनी सूर्यकिरणांची वाट रोखली. त्यामुळे तापमान खाली आले. नागपूरला १.४ अंशाची घट होत पारा ४२.६ अंशावर पोहचला.
भयंकर तापलेल्या चंद्रपूरच्या तापमानात ३.४ अंशाची घसरण होत पारा ४२ अंशावर आला. मात्र जिल्ह्यातील ब्रम्हपुरी शहराचा ताप शनिवारीही कायम होता. येथे ४४.२ अंश तापमान नोंदविण्यात आले, जे विदर्भात सर्वाधिक राहिले. इतर जिल्ह्यातही ढगाळ वातावरणामुळे पारा १ ते २ अंशाने खाली आला. अकोला ४३.९, अमरावती ४२.८, भंडारा ४१, गोंदिया ४०.९, वर्धा ४२.६, यवतमाळ ४२.४ आणि वाशिमला ४१.४ अंशाची नोंद झाली आहे.
एप्रिलचा शेवट, मे ची सुरुवात ‘ताप’मुक्त
हवामान विभागाच्या अंदाजानुसार एप्रिल महिन्यात सुरुवातीपासून आतापर्यंत उन्हाचा त्रास सहन करावा लागला असला तरी महिन्याचा शेवट मात्र तापमुक्त असणार आहे. पुढचे सर्व दिवस अवकाळीची स्थिती असून वीजांच्या कडकडाटासह ताशी ५० ते ६० किमीचे वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मे महिन्याचे सुरुवातीचे दिवसही हीच स्थिती असेल. त्यानंतर मात्र पारा पुन्हा चढेल, असा अंदाज आहे.