23.9 C
Latur
Saturday, February 1, 2025
Homeमहाराष्ट्रढगाळ हवामानाचा अंजीर बागांना फटका

ढगाळ हवामानाचा अंजीर बागांना फटका

सासवड : पुरंदरचे अंजीर सर्वत्र प्रसिद्ध आहेत. फळांचा आकार, रंग आणि चव यामुळे पुरंदरच्या अंजीराला बाजारपेठेत मोठी मागणी असते. बाजारभाव चांगला मिळत असल्याने पुरंदरमधील शेतक-यांचा अंजिराचे उत्पादन घेण्याकडे दिवसेंदिवस कल वाढला आहे.

आजही शेतक-यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू असून भल्या पहाटेपासूनच शेतकरी फळांची तोडणी करताना दिसून येत आहेत. मात्र सध्या हवामान अत्यंत ढगाळ आणि खराब असल्याने फळझाडांवर अनेक रोगांचा प्रादुर्भाव झालेला आहे. त्याचप्रमाणे फळांचा आकार, रंग, चव यामध्ये मोठ्या प्रमाणात बदल झाला असून अनेक प्रकारच्या औषध फवारणी करूनही फळबागेचे व्यवस्थापन कोलमडल्याने अंजीर उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

पुरंदर तालुक्यात अंजीर, सीताफळ, पेरू या फळपिकांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघते. सर्व फळपिकांना पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध बाजारपेठांत मोठ्या प्रमाणात मागणी असते. पूर्वी ठराविक भागात या फळपिकांचे उत्पादन घेतले जात होते. मात्र पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध स्त्रोत निर्माण झाल्याने याचे उत्पादन आणि लागवडीचे क्षेत्र जास्तीत जास्त वाढत आहे. त्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात अंजीर उत्पादक म्हणून पुरंदरची ओळख आहे. गुरोळी, सिंगापूर, सोनोरी, काळेवाडी, वनपुरी, दिवे, पिंपळे पारगाव यासह अनेक गावांतील शेतकरी अंजिराचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत आहेत.

पावसाळा, हिवाळ्यामध्ये खट्टा बहर सुरू असतो तर उन्हाळ्यात मिठा बहर सुरू असतो. अशा पद्धतीने तीनही हंगामांत अंजिराचे उत्पादन मिळत असते. सध्या हिवाळा सुरू असून सर्वत्र अंजिराच्या बागा बहरलेल्या दिसून येत आहेत. त्याचप्रमाणे थंडी पोषक आणि पाणी मुबलक असल्याने उत्पन्नही त्याच पद्धतीने दमदार निघत आहे. तसेच अंजीर बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करण्यासाठी शेतक-यांना भल्या पहाटेच तोडणी करावी लागत आहे. त्यामुळे कडाक्याची थंडी असूनही शेतकरी पहाटेच शेतात अंजिराची तोडणी करताना सर्वत्र दिसून येत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR