पुणे : सध्या तापमानाचा पारा वाढल्याने किमान तापमानातही वाढ झाल्याचे अनुभवायला मिळत आहे. पुणे शहरामध्ये एका दिवसात चार अंशाने किमान तापमानात घट झाली. परिणामी रविवार दि. ८ डिसेंबर रोजी सकाळी पुणेकरांना जराशी हुडहुडी भरणारी ठरली. थंडीमध्ये आणखी वाढ होणार असल्याचा अंदाज सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केला.
गेल्या काही दिवसांमध्ये ‘फेंजल’ चक्रीवादळाने डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातील महाराष्ट्रातील थंडी चांगलीच वाढवली होती. पण वादळ जमिनीवर आल्यानंतर थंडी गायब झाली. पण आता पुन्हा उत्तर भारतात, मार्गस्थ होत असलेले पश्चिमी (झंझावात) वारे व समुद्र सपाटीपासून साडेबारा किमी. उंचीवर वाहणारे उच्च वेगवान पश्चिमी वा-यांचे झोतमुळे थंडीत वाढ होईल. रविवारपासून खान्देश, नाशिक पासून थंडीमध्ये हळूहळू वाढ होऊन संपूर्ण महाराष्ट्रात पुन्हा पुढील १० दिवस म्हणजे बुधवार दि. १८ डिसेंबरपर्यंत थंडी टिकून राहण्याची शक्यता आहे. विदर्भात मात्र थंडीचा परिणाम दोन दिवस उशिराने म्हणजे मंगळवार (दि. १०) नंतर थंडी जाणवेल.
विदर्भ वगळता महाराष्ट्रात सध्या तरी पावसाची शक्यता जाणवत नाही. विदर्भातही आज व उद्याच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवते. परवा, मंगळवार (दि. १०) नंतर तेथेही वातावरण निवळेल, अशी माहिती सेवानिवृत्त हवामानतज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली.
सर्वत्र थंडी वाढली
गेल्या चार-पाच दिवस पुण्यातील किमान तापमान हे २० अंशाच्या जवळपास होते. त्यामुळे उष्णता जाणवत होती. अचानक रविवारी थंडीत वाढ झाली आणि किमान तापमान १६ अंशावर नोंदवले गेले.