पुणे : गेल्या आठवड्यापासून राज्यात नागरिकांना थंडीने गारठून टाकले होते. पण शुक्रवार दि. २० डिसेंबरपासून किमान तापमानात वाढ झाल्याने थंडीचा कडाका कमी झाला आहे. गुरूवारी किमान तापमानाचा पारा ८ अंशावर होता, तो शुक्रवारी थेट १२ अंशावर पोचला. त्यामुळे नागरिकांना थंडीपासून काहीसा दिलासा मिळाला.
उत्तरेकडील थंड व कोरड्या वा-यांचे प्रवाह महाराष्ट्राकडे झेपावत आहेत. त्यामुळे राज्यामध्ये थंडी जाणवत आहे. राज्यातील काही भागात थंडीची लाट अजून कायम आहे. काही भागातील तापमानाचा पारा १० अंशांच्या खाली असल्याने हुडहुडी भरत आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात थंडी कायम राहणार असली तरी किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. दरम्यान, र्नैऋत्य बंगालच्या उपसागरात ठळक कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. ही प्रणाली शुक्रवारी उत्तर तमिळनाडू दक्षिण आंध्र प्रदेशच्या किना-याला धडकून जमिनीवर येण्याचे संकेत आहेत. पुण्यात शिवाजीनगरला शुक्रवारी १२.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर सर्वात कमी तापमान असणा-या एनडीए भागात ११.५ अंशावर पारा नोंदवला गेला.
२४ डिसेंबरपर्यंत लाट ओसरणार
पुढील पाच दिवस म्हणजे मंगळवार दि.२४ डिसेंबरपर्यंत महाराष्ट्रात थंडीची लाट ओसरणार आहे. त्याला सुरवात झाली. किमान तापमानात वाढ होऊन उबदारपणा जाणवू शकतो. पुन्हा वर्षअखेर व नववर्षातील ३० डिसेंबरपासून थंडीत वाढ होण्याची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञांनी म्हटले आहे.
राज्यातील सरासरी तापमान
दि. १६ डिसेंबर : ६.१ (एनडीए)
दि. १७ डिसेंबर : ६.५
दि. १८ डिसेंबर : ७.५
दि. १९ डिसेंबर : ७.५
दि. २० डिसेंबर : ११.५