25.4 C
Latur
Monday, July 1, 2024
Homeमहाराष्ट्रसामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र

सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र

कोल्हापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा कोण यावरून महाविकास आघाडीमधील तिन्ही घटकपक्षांमध्ये मतभेद असल्याचे चित्र दिसत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार यांनी मुख्यमंत्रिपदाच्या चेह-यावरून सूचक विधान केले आहे. पत्रकाराच्या या प्रश्नाला शरद पवारांनी अवघ्या सहा शब्दांमध्ये उत्तर दिले. ‘सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे,’ असे उत्तर शरद पवारांनी दिले.

दरम्यान, सध्या महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री कोण असेल यावरून घटक पक्षांमध्ये शाब्दिक घमासान सुरू आहे. उद्धव ठाकरेंच्या गटाचे प्रवक्ते तसेच राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी सूचक विधान करत उद्धव ठाकरेंच्या नावालाच मुख्यमंत्री म्हणून पसंती असल्याचे आणि तेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील असे दोनच दिवसांपूर्वी सूचित केल्यानंतर पवारांनी यावर भाष्य केले आहे.

शरद पवारांनी आज कोल्हापूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळेस पत्रकारांनी संजय राऊतांनी केलेल्या विधानावरून, उद्धव ठाकरेच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील का? असा थेट प्रश्न विचारला. पत्रकाराच्या या प्रश्नाला शरद पवारांनी काही शब्दांत उत्तर दिले. सामूहिक नेतृत्व हे आमचे सूत्र आहे, असे उत्तर शरद पवारांनी दिले. आमची आघाडी हाच आमचा सामुदायिक चेहरा आहे. इथे कोणतीही व्यक्ती देण्याचा प्रश्न नाही.

मोदींनी महाराष्ट्रात जास्त सभा घ्याव्यात
४८ पैकी ३१ जागा ज्या विचाराचे खासदार आले आहेत त्यावरून जनतेचा ट्रेण्ड काय आहे लक्षात येते, असा टोला शरद पवारांनी विधानसभेला ट्रेण्ड काय असतील या प्रश्नावरून लगावला. राज्यात सरकार बदलण्याचा आमचा प्रयत्न आहे. २८८ विधानसभा निवडणुकीत १५५ ठिकाणी भाजपचा पराभव झाला आहे. त्यामुळे आम्हाला अनुकूल परिस्थिती असून संधी आहे, असेही शरद पवारांनी म्हटले आहे. लोकसभेची मानसिकता विधानसभेलाही कायम राहील, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.

१८ पैकी १४ जागांवर पराभव
तसेच मोदींनी महाराष्ट्रात १८ जागी सभा घेतल्या त्यापैकी १४ जागी पराभव झाल्याची आठवण पवारांनी करून दिली. यावरून मोदींच्या कामकाजावर जनता खुश नाही असे दिसतेय. मोदींची गॅरंटी चालली नाही. विधानसभेला मोदींनी जास्तीत जास्त सभा घ्याव्यात, असा उपहासात्मक टोला पवारांनी लगावला.

अर्थसंकल्पावरून टोला
शरद पवार यांनी शुक्रवारी महाराष्ट्राच्या विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावरूनही टोला लगावला. अगोदरच्या कर्जात असताना या अर्थसंकल्पामुळे त्यात अधिक भर पडणार आहे, असे शरद पवार म्हणाले. पुण्यातील ड्रग्ज प्रकरणावर बोलताना शरद पवारांनी, नव्या पिढीला व्यवसानाधीन बनवण्याचे प्रमाण वाढल्याचे पुण्यावरून दिसते, असे मोजक्या शब्दांमध्ये म्हटले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR