29.7 C
Latur
Tuesday, February 11, 2025
Homeमहाराष्ट्रसोलापूरकर यांना आयोगाची नोटीस

सोलापूरकर यांना आयोगाची नोटीस

बाबासाहेब ब्राम्हण असल्याचा पुरावा द्या

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी उलटसुलट वक्तव्य करून लेखक, दिग्दर्शक व कलाकार राहुल सोलापूरकर यांनी सर्वांचा रोष ओढावून घेतला आहे.

बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने घेतली आहे. त्यांनी केलेल्या विधानाच्या संदर्भात अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. बाबासाहेबांच्या ब्राम्हण असण्याबाबत संदर्भ, पुरावे आयोगापुढे सादर करावे अन्यथा पुढील कारवाईला सामोरे जावे, असा सज्जड इशारा राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाने दिला आहे. राहुल सोलापूरकर यांनी वेदांचा संदर्भ देत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण असल्याबाबत केलेल्या वक्तव्याचे वृत्तवर्तमानपत्र आणि दूरचित्रवाहिन्यांवर प्रकाशित आणि प्रसारित झाले. तशा पद्धतीच्या मौखिक आणि दूरध्वनीद्वारे तक्रारी अनुसूचित जाती जमाती आयोगाला प्राप्त झाल्या.

याबाबत सोलापूरकर यांना आयोगाने नोटीस बजावून विचारणा केलेली आहे की, त्यांनी दिलेले संदर्भ त्यांनी दिलेल्या संदर्भांच्या पुष्ठ्यर्थ काही पुरावे, लिखाण असल्यास ते आयोगाच्या पुढे करावे. सोलापूरकर यांनी तसे वक्तव्य करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला आहे आणि या देशातील दलित, शोषित, वंचितांच्या भावना दुखावलेल्या आहेत. त्यांनी या संदर्भात तत्काळ खुलासा करावा, अशा सूचना राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अ‍ॅड. धर्मपाल मेश्राम यांनी केल्या आहेत.

सोलापूरकर यांनी छत्रपतींनी लाच देऊन औरंगजेबाच्या तावडीतून आपली सुटका करून घेतली होती असे वक्तव्य केले होते. त्यामुळे मराठा समाजामध्ये चांगलाच असंतोष उफाळून आला होता. अनेकांनी सोलपूरकरांना जोड्याने बडवण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर सोलापूरकर यांनी जाहीर माफी मागतिली होती. हे प्रकरण शांत होईल असे दिसत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ब्राम्हण होते, असे वक्तव्य करून पुन्हा वादाला तोंड फोडले. त्यामुळे आंबेडकरी जनतेत प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

काहींनी सोलापूरकर यांचे थोबाड फोडणा-यांना बक्षीससुद्धा जाहीर केले आहे. आंबेडकरी जनतेत निर्माण झालेल्या रोषाची दखल अनुसूचित जाती जामाती आयोगाने घेतली आहे. त्यावर आता राहुल सोलापूरकर काय खुलासा करतात आणि आयोगाकडे आपले म्हणणे काय मांडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR