30.5 C
Latur
Sunday, March 23, 2025
Homeमहाराष्ट्रदंगलखोरांकडूनच वसूल करणार नुकसान भरपाई

दंगलखोरांकडूनच वसूल करणार नुकसान भरपाई

दंगलखोरांची प्रॉपर्टी विकणार, मुख्यमंत्र्यांचा इशारा

नागपूर : नागपुरात सोमवारी दोन गटांत उफाळलेल्या हिंसाचारात जखमी झालेल्या युवकाचा आज मृत्यू झाला. दरम्यान, या प्रकरणी आज मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या पोलिस आयुक्तांबरोबर बैठक घेऊन काही अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतले असून, नागपुरात झालेल्या दंगलीत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. परंतु हे नुकसान दंगलखोरांकडूनच वसूल केले जाईल, त्यांनी हे पैसे भरले नाहीत, तर त्यांच्या मालमत्ता विकून पैसे वसूल केले जातील. कोणत्याही परिस्थितीत त्यांना सोडले जाणार नाही, असा सज्जड दम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दंगलखोरांना दिला.

नागपूर शहरात उसळलेल्या हिंसाचारानंतर राज्य सरकार आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज आढावा बैठक घेतली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत दंगलखोरांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नसल्याचे स्पष्ट केले. घटनेच्या अनुषंगाने आज नागपूरचे पोलिस आयु्क्त, एसपी आणि सर्व वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत आढावा घेतला. एकूण घटनाक्रम आणि त्यानंतर केलेली कारवाई या सर्व गोष्टींसंदर्भातील ही आढावा बैठक होती, असे फडणवीस म्हणाले.

यासंदर्भात मुळातच काही गोष्टी सभागृहात स्पष्ट केल्या होत्या. औरंगजेबाची प्रतिकात्मक कबर सकाळी जाळण्यात आली, त्यानंतर काही लोकांनी तक्रार केली. पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. मात्र, प्रतिकात्मक कबर जाळत असताना कुराणच्या आयत लिहिलेली चादर जळाली, अशा प्रकारचा एक भ्रम तयार करून काही लोकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक अपप्रचार केला.

यातून शहरात दंगल उसळली. जमावाने तोडफोड केली, गाड्या फोडल्या, लोकांवर हल्ला केला. त्यानंतर पोलिसांनी जवळपास ४-५ तासांत दंगलीवर आवर घातला. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईलवरील चित्रिकरण, पत्रकारांनी केलेले चित्रिकरण यात जे दंगेखोर दिसत आहेत, त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. १०४ लोकांना ओळखण्यात आले असून ९२ लोकांना अटक केली आहे. काही लहान बालकांवरही कारवाई सुरू आहे, असेही फडणवीस म्हणाले.

पोस्ट टाकणा-यांना सहआरोपी करणार
जो-जो व्यक्ती दंगा करताना दिसतोय, दंगेखोरांना मदत करताना दिसतोय, अशा प्रत्येकावर कारवाई करण्याची मानसिकता पोलिसांची आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. सोशल मीडियाचे ट्रॅकिंग करून ही घटना घडावी म्हणून पोस्ट ज्यांनी केली, त्या सर्वांना दंगेखोरांसोबत सहआरोपी केले जाणार आहे.

भडकवणारे पॉडकास्ट करणा-यांनाही इशारा
जवळपास ६८ पोस्ट ओळखण्यात आल्या असून डिलिट केल्या आहेत. अजून काही पोस्टची माहिती घेणे चालू आहे.. भडकवणारे पॉस्टकास्ट, चुकीच्या पोस्ट टाकून अफवा पसरवून लोकांमध्ये भीती निर्माण केलेल्या लोकांवर कारवाई केली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR