28.4 C
Latur
Saturday, January 11, 2025
Homeसोलापूरसुशील वाल्मीक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध सोलापूरात फिर्याद

सुशील वाल्मीक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध सोलापूरात फिर्याद

सोलापूर : सोलापूर येथील महिला व तिचा पती व तिचे दोन मुले हे परळी येथे राहण्यास होते. परळी येथे राहत असताना तिचा पती हा सुशील वाल्मीक कराड यांच्या ट्रेडर्समध्ये कामास होता. सुशील कराड हा तिच्या पतीस तू दोन बल्कर ट्रक, दोन कार व जागा कसे काय कमावला म्हणून मारहाण करून रिवाल्वर चा धाक दाखवून तिच्या पतीकडून दोन बल्कर ट्रक, दोन कार, दोन दुचाकी व पीडीतेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे यांच्या नावावर करून बळजबरीने घरातून उचलून नेऊन कोणतेही पैसे न देता खरेदी केला, तसेच तिचे अडीच तोळ्यांचे सोने हे परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्स ला बळजबरीने विकायला लावले व त्याचे आलेले पैसे सुशिल कराड याने घेतले, तसेच तिच्या लहान मुलीस देखील मारहाण केली, अशा आशयाची तक्रार वजा सविस्तर फिर्याद पीडित महिलेने एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली.

त्यांनी फिर्यादीची दखल घेतली नाही म्हणून तिने पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार केली, परंतु पोलीस आयुक्त, सोलापूर यांनी देखील दखल घेतली नाही. त्यावर महिलेने एमआयडीसी पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त, सोलापूर व पोलीस अधीक्षक, बीड यांचेकडे व वरिष्ठ पोलीस अधिका-यांना रजिस्टर पोस्टाने तक्रार तसेच तक्रारीच्या अनुषंगाने असलेले कागदपत्रे पोस्टाने पाठवून दिली, तरी देखील कोणत्याही पोलीस अधिका-याने तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही व आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद केला नाही, त्यावर सदर महिलेने सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खाजगी फिर्याद वजा तक्रार दाखल करून त्याप्रमाणे विविध कलमान्वये पोलिसांना सुशील कराड,अनिल मुंडे,गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश पारित करण्याची विनंती केली. त्यावर न्यायालयाने आरोपीचे म्हणणे मागविले, आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केले असून आज रोजी आरोपींचे वकील नसल्यामुळे चौकशीस १३/१/२०२५ ही तारीख न्यायालयाने नेमली. यात पीडिते तर्फे अ‍ॅड. विनोद सूर्यवंशी, अ‍ॅड. श्रीकांत पवार, अ‍ॅड. मधुकर व्हानमाने हे काम पाहत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR