31.8 C
Latur
Thursday, July 4, 2024
Homeसोलापूरबायोमेडिकल वेस्टची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

बायोमेडिकल वेस्टची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

सोलापूर : जिल्ह्यात गाजत असलेल्या बायोमेडिकल वेस्ट घोटाळ्याबाबत पुरावे व फोटोसहित डॉ. संदीप आडके यांनी जिल्हाधिकारी तथा महानगरपालिका आयुक्त कुमार आशीर्वाद यांच्याकडे मक्तेदार एस. एस. सर्व्हिसेस, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुढील आठवड्यात बैठक लावली आहे.

सोलापूर महापालिकेतील तत्कालीन उपायुक्त विद्या पोळ यांनी टेंडर प्रक्रियेचे सर्व निकष व नियम धाब्यावर बसवून पाच जानेवारीला एस. एस. सर्व्हिसेस, कोल्हापूर या कंपनीस जिल्ह्यातील बायोमेडिकल वेस्ट संकलन, वाहन व प्रक्रिया करण्याची निविदा दिली. या निविदेमध्ये तब्बल १६ त्रुटी असल्याचे याआधीचे मक्तेदार बायोक्लिन सिस्टिम यांनी महानगरपालिका आयुक्तांना कळवले आहे.

नवीन मक्तेदाराकडे आजपर्यंत कचरा संकलन, वाहन व नष्ट करण्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कोणतेही लायसन्स नाही. परंतु महापालिकेतील तत्कालीन आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी यांनी या मक्तेदारास फक्त नोटिसा पाठवण्याशिवाय काही केले नाही. २७ फेब्रुवारीला आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीचा वृत्तांत बदलून फेरवृत्तांत मक्तेदारांच्या एस. एस. सर्व्हिसेसच्या बाजूने दाखल केला आहे. विशेष म्हणजे या दोन्हीही वृत्तांतावर आयुक्त शीतल तेली-उगले यांच्या सह्या आहेत.सुधारित दरपत्रक डॉक्टरांनी अमान्य केले.

सर्व डॉक्टर्सना आपण जर ३१ एप्रिलपर्यंत नोंदणी करून घेतली नाही, तर १ मेपासून आपला कचरा उचलला जाणार नाही, अशी धमकीच मनपा उपायुक्त आशिष लोकरे यांनी लेखी पत्राद्वारे दिली आहे. सोलापुरातील डॉक्टरांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. असे असतानासुद्धा डॉक्टरांवर बैठकांसाठी बोलवणे व दबाव आणणे, अशा चुकीच्या गोष्टी सुरू आहेत असे तक्रारदार डॉ. संदीप आडके यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR