25.7 C
Latur
Friday, February 28, 2025
Homeराष्ट्रीयभारत-म्यानमारमध्ये मुक्त संचारावर पूर्ण बंदी

भारत-म्यानमारमध्ये मुक्त संचारावर पूर्ण बंदी

केंद्र सरकारचा निर्णय गृहमंत्री शहा यांची माहिती

नवी दिल्ली : गृह मंत्रालयाने मोठा निर्णय घेतला आहे. भारत आणि म्यानमार दरम्यान होणा-या मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मंत्रालयाने लष्कराला सूचना दिल्या आहेत. म्यानमारमध्ये सुरु असलेल्या अशांततेच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवार दि. ८ फेब्रुवारी रोजी जाहीर केले की, देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी भारत आणि म्यानमारमधील मुक्त संचारावर बंदी आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमारमध्ये यादवी सुरु आहे. त्यामुळे अनेक म्यानमारचे लोक ईशान्य भारतात घुसखोरी करत आहेत. त्यामुळे ईशान्य भारतात या लोकांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीकोणातून हा निर्णय घेण्यात आला आहे. म्यानमार आणि भारतादरम्यान कुंपण घालणार असल्याचे अमित शहा यांनी याआधी जाहीर केले होते. वांशिक हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात म्यानमारी सैनिक भारतात आश्रय घेत होते. त्यानंतर अमित शहा यांनी अभेद्य कुंपण घालणार असल्याची माहिती दिली होती. म्यानमार-भारतादरम्यान १६४३ किलोमीटरची सीमा आहे. या सर्व सीमेवर कुंपण घातले जाणार आहे. पेट्रोलिंगसाठी देखील वेगळी व्यवस्था केली जाणार आहे.

६०० पेक्षा अधिक सैनिक भारतात
गेल्या तीन महिन्यांमध्ये ६०० पेक्षा अधिक म्यानमारच्या सैनिकांनी भारतात प्रवेश केला आहे. या सैनिकांनी मिझोरामच्या लंगतलाई जिल्ह्यात आश्रय घेतला आहे. म्यानमारमधील यादवी पाहता ही संख्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच म्यानमारच्या राखाईन प्रांतातील रोहिंग्या मुस्लीम देखील भारतात अनधिकृतपणे येत आहेत. याला आळा घालण्यासाठी मोदी सरकार कटिबद्ध असल्याचे अमित शहा म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR