16.2 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeहिंगोलीगत ४७ वर्षांत हिंगोलीचा संमिश्र कौल

गत ४७ वर्षांत हिंगोलीचा संमिश्र कौल

किनवट : हिंगोली लोकसभा मतदार संघ देशासाठी झालेल्या पाचव्या लोकसभेच्या निवडणुकी मध्येअस्तित्वात आला होता. हिंगोली लोकसभा मतदार संघातील मतदारांनी १९७७ मध्ये प्रथमत: आपल्या विभागाचा खासदार निवडण्यासाठी मतदान केले होते. तेव्हापासून आजपर्यंत या मतदारसंघातून बारा वेळा खासदार निवडले गेले. परंतू कुठल्याच एका पार्टीची मक्तेदारी म्हणून हा मतदारसंघ कधीच राहिला नाही. संमिश्र कौल देणारा मतदार संघ म्हणून या मतदारसंघाची स्वतंत्र ओळख आहे.

आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असताना या मतदारसंघात कोण विजयश्री खेचून आणणार याबाबत तर्क वितर्क लढविले जात आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे २०१९ मध्ये निवडून आलेले सध्याचे खासदार शिवसेनेचे हेमंत पाटील आहेत. या मतदार संघातून ५ वेळा काँग्रेसचे तर ५ वेळा शिवसेनेचे एक वेळा जनता पक्ष व एक वेळा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार निवडून आले आहेत. १९७७ च्या लोकसभा निवडणूकीपासून हिंगोली लोकसभा मतदारसंघात संमिश्र कौल! आला आहे. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे राजीव सातव यांनी शिवसेनेच्या सुभाष वानखेडे यांचा अवघ्या १ हजार ६३२ मतांनी पराभव करत मोदी लाटेत विजय मिळवला होता. राजीव सातव(काँग्रेस) यांना ४ लाख ६७ हजार ३९७ , सुभाष वानखेडे(शिवसेना) ४ लाख ६५ हजार ७६५ इतकी मते मिळाली होती. माहूर किनवट मधून मिळालेली निर्णायक आघाडीचं मते राजीव सातवांच्या विजयाचे गमक होते.

२०१९ मध्ये हेमंत पाटील यांनी सुभाष वानखेडे यांचा पराभव करत विजय मिळवला होता. हिंगोली लोकसभा मतदार संघात असलेल्या ६ विधानसभा पैकी १) उमरखेड विधानसभा मतदार संघाचे आमदार नामदेव जयराम ससाणे ( भाजपा ) २) कळमनूरी विधानसभा आमदार संतोष बांगर ( शिवसेना शिंदे गट) ३) वसमत विधानसभा आमदार चंद्रकांत रमाकांत नवघरे (रा.कॉ.)४) हिंगोली विधानसभा आमदार तानाजी सखाराम मुटकुळे (भाजपा) ५)हादगाव विधानसभा आमदार माधवराव जवळगावकर(काँग्रेस) ६) किनवट – माहूर विधानसभा आमदार भिमराव केराम(भाजपा) हे सध्या आमदार आहेत.

त्या विधानसभा क्षेत्रातील आमदाराच्या आकडे वारीवरून लक्ष वेधल्यास या मतदारसंघात सेना भाजप युतीचे पारडे जड दिसते. परंतु नेहमीच धक्कादायक निकाल देण्याची परंपरा असलेल्या मतदार संघात मतदार कोणाच्या बाजूने कल देतात हे सांगणे फारच कठीण आहे. कारण आज वरचा इतिहास बघितल्यास १९७७ – ८० मध्ये चंद्रकांत पाटील (जनतापक्ष) १९८०-८४ उत्तमराव राठोड,(काँग्रेस), १९८४ – ८९ उत्तमरावराठोड,(काँग्रेस), १९८९-९१ उत्तमराव राठोड,(काँग्रेस), १९९१ – ९६ विलास गुंडेवार (शिवसेना), १९९६ – ९८ शिवाजीराव माने (शिवसेना), १९९८ – ९९ सूर्यकांता पाटील (कॉंग्रेस), १९९९ – २००४ शिवाजीराव माने(शिवसेना), २००४-०९ सूर्यकांता पाटील (राष्ट्रवादी कॉंग्रेस), २००९ – २०१४ सुभाष वानखेडे (शिवसेना) व २०१४ ते २०१९ राजीव सातव(काँग्रेस) २०१९ – २०२४ हेमंत पाटील ( शिवसेना )यांना मतदारांनी संसदेत पाठविले आहे.

यावरून हे स्पष्ट होते की, हा मतदार संघ कोण्या एका पक्षाची मक्तेदारी नाही. सध्या होवू घातलेल्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकी साठी शिवसेना ( बाळासाहेब ठाकरे शिंदे गट ) कडून बाबुराव कोळीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे गट ) कडून नागेश पाटील आष्टीकर वंचीत कडून बी .डी. चव्हाण यांना उमेदवारी दिली गेली आहे. त्यामुळे आता हिंगोली मतदार संघात तिरंगी लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. इतर पक्षाचे व अपक्ष उमेदवारानी अर्ज भरले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR