सोलापूर : सोलापूर महापालिकेतील विविध विभागातील सर्व कर्मचारी, अधिका-यांना हालचाल नोंद रजिस्टरची सक्ती करण्यात आली आहे. कर्मचारी कुठे जाणार? काय काम आहे? कशासाठी जाणार? याची नोंद करणे गरजेचे आहे. अन्यथा संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले आहे.
महापालिकेचे उपायुक्त आशिष लोकरे यांनी अचानकपणे महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीतील विविध विभागांची पाहणी केली. कर्मचा-यांच्या हजेरींची तपासणी केली. साधारणत: ८६० कर्मचारी गैरहजर असल्याची प्राथमिक माहिती आहे. गैरहजर कर्मचा-यांना नोटीस बजावण्यात येणार असून समाधानकारक खुलासा नसल्यास कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. यामुळे कर्मचा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.
महापालिकेतील कर्मचा-यांची गैरहजेरी हा नित्याचा भाग झाला आहे. बायोमेट्रिक हजेरी तपासली तेव्हा ८६० कर्मचारी गैरहजर असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली. मात्र शिफ्टनसार कर्मचारी येत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, शिफ्टनुसार किती कर्मचारी येतात? याचीही माहिती घेण्यात येणार आहे. यातून किती कर्मचारी गैरहजर आहेत त्याची माहिती मिळेल. गैरहजर कर्मचा-यांना नोटीस बजावण्यात येणार असून खुलासा मागविण्यात येणार आहे. खुलासा असमाधानकारक असल्यास संबंधितांचा एक दिवसाचा पगार कपात करण्यात येणार आहे असे उपायुक्त आशिष लोकरे यांनी स्पष्ट केले.
महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी केलेल्या पाहणीत पाच कर्मचारी हे टी-शर्ट घालून आले असल्याचे दिसून आले. त्यांना ड्रेस कोडमध्ये येण्यास सांगण्यात आले तर काही कर्मचा-यांकडे ओळखपत्र नसल्याचे दिसून आल्याने समज देण्यात आली. ड्रेस कोड आणि ओळखपत्र बंधनकारक असल्याचे स्पष्टपणे सुचित करण्यात आले.
महापालिकेतील प्रशासकीय इमारतीत आल्यानंतर प्रत्येक नागरिकांनी आपले कोणत्या विभागात काम आहे? कशाचे काम आहे? याची नोंदणी रजिस्टरमध्ये करणे आवश्यक आहे. नोंदणी करूनच त्या विभागात संबंधित नागरिकांनी जावयाचे आहे. त्यासाठी प्रशासकीय इमारतीच्या मुख्य दरवाजातच सुरक्षा रक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे.