ठाणे : आदिवासी भागात आरोग्यव्यवस्था पोहोचत नसल्यामुळे प्रसूतीदरम्यान मातामृत्यूंच्या घटना अद्याप कायम आहेत. कोकण विभागाचा विचार केल्यास, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांच्या तुलनेत ठाणे जिल्ह्यात मातामृत्यूंचे प्रमाण अधिक असल्याचे अहवालामधून स्पष्ट होत आहे.
कोकण विभागात एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यांत ७६ मातांचा मृत्यू झाल्याची नोंद असून यातील ५४ मृत्यू ठाण्यात झाले आहेत. यातील १७ मृत्यू ठाणे महापालिका हद्दीत झाले आहेत. शहरातील मातामृत्यूंचा हा आकडा चिंताजनक आहे.
गेल्या काही वर्षांत मातामृत्यू ही चिंतेची बाब ठरली आहे. कोकण विभागातील पालघर, रायगड आणि ठाणे या जिल्ह्यांचा समावेश होतो. मात्र पालघर आणि रायगड या दोन जिल्ह्यांच्या तुलनेत ठाण्यात मातामृत्यूंची संख्या मोठी आहे. जिल्ह्यात एप्रिल ते ऑक्टोबर २०२३ या सात महिन्यांत ५४ मातांचा मृत्यू झाला आहे. गतवर्षी संपूर्ण वर्षभरात हा आकडा ९२ होता. या वर्षाच्या पहिल्या सात महिन्यांत रायगडमध्ये ११ आणि पालघरमध्ये ११ मातामृत्यूंची नोंद झाली आहे.
ग्रामीण भागात आरोग्यसुविधांचा अभाव, रस्त्यांचा अभाव यांमुळे मातामृत्यू हे वास्तव आहे. मात्र शहरात सर्व सुविधा असूनही ठाणे महापालिका हद्दीत १७ मातामृत्यूंची नोंद या सात महिन्यांच्या कालावधीत झाली आहे. ठाणे ग्रामीण भागामध्ये १६ मातामृत्यू नोंदवले आहेत. कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, भिवंडी, मीरा-भाईंदर या महापालिका क्षेत्रांच्या तुलनेत ठाणे महापालिकेत मातामृत्यूंची संख्या अधिक आहे.