नवी दिल्ली- म्यानमारमध्ये परिस्थिती चिघळल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने भारतीय नागरिकांना आवश्यक नसल्यास प्रवास न करण्याच्या सूचना दिल्या आहेत. जे नागरिक म्यानमारमध्ये आहेत त्यांनी खबरदारी घ्यावी आणि हिंसाग्रस्त भागात प्रवास करणे टाळावे. तसेच रस्त्यावरून आंतरराष्ट्रीय प्रवास टाळावा, अशा मार्गदर्शक सूचना सरकारकडून जारी करण्यात आल्या आहेत.
भारत सरकारने यां गोन येथील दूतावासामध्ये नागरिकांना नोंदणी करण्यास सांगितले आहे. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर आणि सुरक्षा दलांमधील संघर्षाने भीषण रूप धारण केले आहे. भारताने म्यानमारला शांततेचे आवाहन केले असून चर्चेतून प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिला आहे.
संघर्षाला सुरुवात झाल्यापासून म्यानमारचे हजारो नागरिक, काही लष्करी कर्मचारी यांनी मिझोराममध्ये आश्रय घेतला आहे. भारताच्या सीमेला लागून असलेल्या भागात संघर्ष उफाळला आहे. त्यामुळे मोठ्या संख्येने लोकांचे भारतात स्थलांतर होत आहे. मिझोराम आणि म्यानमारमध्ये ५१० किलोमीटरची सीमा सामायिक आहे. त्यामुळे संघर्षाची व्याप्ती वाढल्यास मोठ्या प्रमाणात स्थलांतर होऊ शकते.