मुंबई : शेतक-यांची कर्जमाफी हा महायुती सरकारपुढे पेच आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कर्जमाफीचे आश्वासन दिले होते असा शेतकरी संघटनांचा दावा आहे. त्यामुळे हा प्रश्न सरकारपुढे अडचणीचा ठरत आहे.
नवे मंत्रिमंडळ अस्तित्वात येतात कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमाफी या विषयावर हात झटकले होते. हा विषय आपल्या अखत्यारीत येत नाही, असे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे शेतक-यांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटली होती. या संदर्भात जिल्हा बँका तसेच सहकारी संस्था पुढे कर्ज वसुलीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शेतक-यांनी ३१ मार्चपूर्वी आपले थकीत काम कर्ज अदा करावे, असे स्पष्ट केले होते.
सरकारच्या आर्थिक स्थितीमुळे उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे नेते कर्जमाफी होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर याबाबत मोठया प्रमाणावर टीका झाली शेतकरी संघटनांनी आता व्यक्त केला होता. त्यामुळे सावध होत कृषीमंत्री कोकाटे यांनी यासंदर्भात आपण मुख्यमंर्त्यांकडे हा विषय मांडू. मंत्रीमंडळाच्या बैठकीत कर्जमाफी विषयावर चर्चा करू अशी सावध भूमिका घेतली होती.
कर्जमाफीचा मुद्दा सोडला नाही : तटकरे
आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनीही वेगळ्याच राग आळवला आहे. कर्जमाफीचा विषय पूर्णपणे सोडलेला नाही असे सांगत त्यांनी नाराज शेतक-यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला आहे. कर्जमाफीच्या प्रश्नावर शेतक-यांचा आणि शेतकरी संघटनांचा रोष प्रामुख्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विषयी आहे. त्यामुळे यातून बाहेर पडण्यासाठी तटकरे यांनी ही भूमिका घेतली की काय? अशी चर्चा आहे.
मंत्र्यांमध्येच भिन्न मते
शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर विरोधी पक्ष देखील आग्रही आहे. काँग्रेसने याबाबत उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर झोंबणारी टीका केली होती. त्याचे गांभीर्य जाणवू लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या मंत्र्यांमध्येच या विषयावर भिन्न मते असल्याचे दिसते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष कर्जमाफीच्या प्रश्नावर निर्माण झालेला गोंधळ केव्हा निवळणार? या चर्चेला नव्याने तोंड फुटले आहे.