पुणे : प्रतिनिधी
राज्यात सध्या महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा बोलबाला सुरू आहे. अनेक ठिकाणी या योजनेचे कार्यक्रम, शुभारंभ केले जात आहेत. या योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे.अशातच या योजनेचे श्रेय घेण्यासाठी महायुतीत रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गटात योजनेच्या नावावरून धुसफूस सुरू असल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आज होणा-या आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे पक्षाच्या वतीने बहिष्कार टाकण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या जन सन्मान यात्रेत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या योजनेचे नाव बदलून ‘माझी लाडकी बहीण’ असे नामकरण करून प्रचार व प्रसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने करण्यात येत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शिवसैनिकांनी नाराजी व्यक्त करत महायुतीच्या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
राज्यात महायुती असतानाही आंबेगाव, शिरूर विधानसभा क्षेत्रातील कार्यकर्ते आणि पदाधिका-यांकडून मुख्यमंत्री या नावाला बगल दिली जात असल्याने शिवसैनिक नाराज झाले आहेत. त्यामुळे त्यांनी उद्याच्या कार्यक्रमावर आणि बैठकीवर बहिष्कार टाकला आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्रात जनसन्मान यात्रा काढली आहे. आज ही यात्रा आंबेगाव तालुक्यात असणार आहे. या निमित्ताने आंबेगाव शिरूर विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी लाडकी बहीण योजनेचे बॅनर्स लावले आहेत.
या बॅनर्सवरून ‘मुख्यमंत्री’ शब्द वगळून टाकण्यात आला आहे. यावरून शिवसेना शिंदे गटातील नेते तसेच पदाधिकारी नाराज झाले आहेत. त्यांनी थेट महायुतीच्या बैठकीवरच बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एकत्रित लढण्यावर आणि जिंकण्यावर ठाम विश्वास दाखवणा-या महायुती सरकारमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा संघर्ष होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.