मुंबई : प्रतिनिधी
राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्यानंतर विधानसभेत भाजप नेते आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या वक्तव्याबाबत भूमिका मांडली. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्र बेचिराख होण्यापासून वाचवल्याचे म्हटले होते. या वक्तव्याचा आधार घेत आशिष शेलार यांनी मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीची मागणी केली. जरांगेंनी भुजबळ, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि मुख्यमंत्री शिंदे यांच्याबाबत वापरलेली भाषा योग्य नसून या सर्व प्रकरणाची एसआयटी चौकशीची मागणी शेलार यांनी केली. शेलार यांच्या मागणीनंतर बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भूमिका मांडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली.
आशिष शेलार यांनी मनोज जरांगेंच्या आंदोलनाच्या एसआयटी चौकशीची मागणी करताना महाराष्ट्र बेचिराख करण्याची योजना कुणी केली, असा सवाल केला. उपमुख्यमंत्र्यांना संपवून टाकू असे म्हणण्याचे बळ कुणी दिले, असा सवाल आशिष शेलार यांनी केला.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील या मुद्यावर भाष्य केले. मनोज जरांगेंचे आंदोलन शांततेत सुरू होते. शांततेने मोर्चे सुरू असायचे. शांततेने चाललेल्या उपोषणाला जे कुणालाही माहिती नव्हते त्यांच्यावर लाठीचार्ज झाला, महिला अन् मुलांना मारहाण झाली. मनोज जरांगेंच्या सभा लाखोंच्या झाल्या. सरकार आणि जरांगेंचा संवाद सुरू होता. मुंबईकडे येणारा मोर्चा नवी मुंबईत थांबल्यानंतर मध्यस्थी झाली आणि गुलाल उधळला गेला. नंतर का आंदोलन सुरू झाले, असा प्रश्न आम्ही विचारले होते, असे बाळासाहेब थोरात म्हणाले. मनोज जरांगेंचे उपोषण सुरू झाल्यावर त्यांच्यावर आरोप झाले. मनोज जरांगेंच्या चुकीच्या वक्तव्यांचे समर्थन करणार नाही, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महाराष्ट्रात जे काय होते, त्याच्या तळापर्यंत जाण्याची गरज आहे. आरोप करण्यापेक्षा महाराष्ट्राने समाजाचा हिरो होण्याचा प्रयत्न कुणी केला हे पाहिले आहे. जोशी जनरल डायरसारखा वागला आणि तिथून गालबोट लागले, असे विजय वडेट्टीवार म्हणाले. मनोज जरांगेंची चौकशी करा, थांबवले कुणी, असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.
देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगेंना घरी जाऊन भेटणारे कोण होते, या आंदोलनामागे कोण होते? याची चौकशी करण्यात येईल. या प्रकरणाची एसआयटी चौकशी होईल. मात्र, या प्रकरणामागे कोण आहे, याची चौकशी करून हे षडयंत्र बाहेर काढले जाईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांनी जरांगेंबाबत आपली तक्रार नसल्याचे म्हटले. मराठा समाजाबाबत मला कुणाकडून कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.