मुंबई : राज्य सरकारने मंत्रालय सुरक्षा अधिक भक्कम केली आहे. मंत्रालय प्रवेशासाठी नवीन एफआरएस(फेस रिकग्नीशन सिस्टिम) प्रणाली लागू केली आहे. मात्र, अधिकारी-कर्मचा-यांचा पूर्ण डेटा अपलोड न झाल्याने पहिल्याच दिवशी मंत्रालय प्रवेशात गोंधळ उडाला. मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचा-यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. सोमवारी अनेक कर्मचा-यांना लेटमार्क बसला.
मंत्रालयात अनेकदा आत्महत्या, आत्महत्यांचा प्रयत्न, आंदोलने आदी प्रकार घडले आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रालय सुरक्षा अधिक भक्कम करण्यासाठी ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. मात्र या प्रणालीचा डेटा पूर्ण अपलोड झालेला नाही. त्यामुळे सोमवारी मंत्रालय प्रवेशद्वारावर मोठा गोंधळ उडाला. अनेक कर्मचारी-अधिकारी यांचा डेटा अपलोड न झाल्याने त्यांना ओळखपत्र असूनही प्रवेशद्वारातून प्रवेश मिळाला नाही. त्यांना नियमित पास काढून आत यावे लागले. पास काढण्यासाठी भली मोठी रांग होती. त्यामुळे या सरकारी अधिका-यांचा खोळंबा झाला. रांगेत उभे राहावे लागल्याने अनेकांना लेटमार्क बसला. नवीन प्रणाली असल्याने प्रवेश करतेवेळी सर्वसामान्य नागरिक आणि पोलिस यांच्यात वादावादीचेही प्रसंग होत आहेत.