नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशाच्या राजकारणात अभूतपूर्व ठरलेल्या आप आणि काँग्रेसच्या संघर्षाचा इतिहास नवीन नाही. या दोन पक्षांमुळेच भाजपला देशव्यापी पाय पसरता आले. आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपसमोर तगडे आव्हान निर्माण करण्यासाठी आप आणि काँग्रेस पक्ष एकत्र आले आहेत. आपचे प्राबल्य असलेल्या चार राज्यांत आप आणि काँग्रेसचे जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे.
दिल्ली, गुजरात, पंजाब आणि हरियाणा या चार राज्यांत काँग्रेस आणि आपमध्ये जागा वाटपाला जवळपास अंतिम रूप देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि आपमध्ये सातत्याने बैठकांचे सत्र सुरु असून या बैठका फलद्रुप होत असल्याचे चित्र आहे. या बैठकांनंतर दोन्ही पक्षांमधील ज्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत, त्यामध्येसुद्धा या दोन्ही पक्षांमध्ये विरोधाभास दिसून आलेला नाही. त्यामुळे चर्चा योग्य टप्प्यात असल्याचे मानले जात आहे. या राज्यांतील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती आहे. दोन्ही पक्षांनी चार राज्यांमध्ये किती जागा लढवणार? यावर जवळपास ठरवले आहे. आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मलिकार्जुन खरगे यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर अनेक निर्णयांवर एकमत झाले. या फॉर्मुल्यावर अंतिम बोलणी सुरू आहेत. त्यामुळे उर्वरित चर्चा पूर्ण झाल्यानंतर औपचारिक घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार दिल्लीत आप ४ तर काँग्रेस ३ जागांवर निवडणूक लढवू शकते. पंजाबबाबत दोघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत. मात्र, निवडणुकीपूर्वी अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र आल्यास त्यानंतर दोन्ही पक्ष पंजाबमध्ये निवडणूक लढवतील, असेही त्यांच्यात ठरले आहे. गुजरातमध्ये काँग्रेस आपला फक्त २ जागा देऊ शकते. आपने २ हून अधिक जागा मागितल्या आहेत. हरयाणातही आप २ ते ३ जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे. मात्र, इथेही काँग्रेस आम आदमी पार्टीला १ पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. गोव्यात काँग्रेस सध्या आपला एकही जागा देण्यास तयार नाही. कारण गोव्यात लोकसभेच्या फक्त २ जागा आहेत.