पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. राज्यातील सर्व जागांसाठी महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. जागावाटपाबाबत पक्षांनी चर्चा सुरू केल्या आहेत. तर गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मतदारसंघावर दावा सांगण्यास सुरूवात झाली आहे. अशातच पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेस पक्षाने दावा सांगितल्याच्या चर्चा सुरू आहेत.
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून आमदार रवींद्र धंगेकर इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत वरिष्ठ नेत्यांकडे त्यांनी याबाबतची इच्छा व्यक्त केली आहे. आज दिल्लीत लोकसभा समन्वयकांची बैठक पार पडली. या बैठकीसाठी रवींद्र धंगेकर आज दिल्लीत आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लोकसभेत आज काँग्रेसच्या जागा जास्त आहेत; काँग्रेस जास्त जागांवर जिंकूही शकते, असं म्हटलं होतं. त्यामुळे जागावाटपाबाबत चर्चा झाल्यानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर काँग्रेसला संधी मिळण्याची शक्यता आहे.