25.5 C
Latur
Thursday, January 30, 2025
Homeमहाराष्ट्रएसटीची भाडेवाढ रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

एसटीची भाडेवाढ रद्द करण्याची काँग्रेसची मागणी

एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबवल्यास भाडेवाढीची गरज नाही - नाना पटोले

मुंबई (प्रतिनिधी) : आर्थिक तोटा भरून काढण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाने लागू केलेल्या एसटीच्या भाडेवाढीला काँग्रेसने विरोध करत ही दरवाढ तात्काळ रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रवासी भाडेवाढ कारण्याऐवजी एसटी महामंडळातील भ्रष्टाचार थांबविण्याचा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीत जनतेवर सवलतींचा वर्षाव करणा-या भाजप युती सरकारने सत्तेत येताच जनतेला लुटण्याचे काम सुरू केले आहे. आधीच महागाईवर नियंत्रण मिळवण्यात महायुती सरकार सपशेल अपयशी ठरले असताना आता राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवन वाहिनी असलेल्या एसटीच्या तिकिट दरात १५ टक्के वाढ करून सरकार जनतेची लूट करीत आहे, असा आरोप पटोले यांनी मंगळवारी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलताना केला.

एसटीने २५ जानेवारीपासून आपल्या प्रवासी भाड्यात १५ टक्के वाढ केली आहे. या दरवाढीबाबत बोलताना पटोले म्हणाले, एसटी बस सेवा राज्याच्या कानाकोप-यात सुरू आहे; पण महामंडळाला ही सेवा व्यवस्थित देता येत नाही. एसटी महामंडळाच्या भोंगळ कारभाराचा फटका राज्यातील सर्वसामान्य प्रवाशांना सहन करावा लागत आहे. ग्रामीण भागात तर एसटी बसची अवस्था पहावत नाही. शिवशाही नावाने सुरू केलेल्या बससेचीही दूरवस्था झाली आहे.

प्रवाशांना व्यवस्थित सेवा देत येत नसताना दुसरीकडे महागाईचे कारण देत १५ टक्के भाडेवाढ केली आहे. एसटीच्या भाडेवाढीची परिवहन मंत्र्यांनाच माहिती नाही, असे स्वत: मंत्रीच सांगत असतील तर त्यांनी पदावर कशाला राहावे? आपल्या खात्यात काय चालले आहे? याची माहितीच मंत्र्यांना नाही हे आश्चर्यकारक आहे. ज्या अधिका-यांनी मंत्र्यांना विश्वासात न घेताच भाडेवाढीचा निर्णय घेतला त्यांना निलंबित करा. जनतेची लूट करणारा निर्णय माहित नसणा-या मंत्र्यांना एसटी महामंडळाची राज्यातील १ हजार ३६० हेक्टर मोकळी जागा बिल्डरांच्या घशात घालण्यात जास्त रस दिसत आहे, अशी टीकाही पटोले यांनी केली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR