नागपूर : महाराष्ट्रात होणाऱ्या आगामी निवडणूका काँग्रेसने गांभीर्याने घेतल्याचे दिसत आहे. महाराष्ट्रातील पक्ष संघटनेत चैतन्य आणण्यासाठी काँग्रेसकडून महाराष्ट्रात महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या महारॅलीसाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेतृत्व महाराष्ट्रात येणार आहे. काँग्रेस पक्षाच्या स्थापना दिनी म्हणजेच २८ डिसेंबर रोजी नागपूरात काँग्रेसची भव्य रॅलीचे आजोजन करण्यात आले आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल, मुकुल वासनिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस कमिटीची बैठक नागपूर येथे पार पडली. या बैठकीत या विषयी चर्चा करण्यात आली असून या बैठकीसाठी महारष्ट्र काँग्रेसचे मोठे नेतेही उपस्थित होते.
विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, राज्यभरातील १० लाख काँग्रेस कार्यकर्ते या सभेला उपस्थित राहणार. तसेच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, माजी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि वर्किंग कमिटीचे सर्व सदस्य या महारॅलीला उपस्थित राहणार आहेत. तसेच नागपूर येथे झालेल्या बैठकीला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री व काँग्रेस कार्यसमितीचे सदस्य अशोकराव चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील आणि माजी मंत्री प्रदेश, कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.