मुंबई : विधान परिषदेच्या ११ जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडले. शिंदे गटाच्या नेत्यावर गोळीबार केल्याने तुरुंगात असलेले भाजप आमदार गणपत गायकवाड विधान परिषद निवडणुकीसाठी विधान भवनात दाखल झाले आहेत. पण त्यांना काँग्रेसच्या आक्षेपानंतर मतदान करू दिलेले नाही. काँग्रेस पक्षाने गणपत गायकवाड यांच्या मतदानावर आक्षेप घेतला असून त्यामुळे गायकवाड यांना मतदान करू दिले नाही.
काँग्रेसने केलेल्या तक्रारीनंतर निवडणूक आयोग कामाला लागले असून आयोगाकडून नियमांचा आढावा घेण्यात काम सुरू आहे. निवडणूक अधिका-याने यावर राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टोक्ती मागवली आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट केल्यानंतरच गणपत गायकवाड यांना मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. दरम्यान, आज होणा-या विधान परिषद निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि एआयएमआयएमचे एकूण ३ आमदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या आमदारांनी मविआला मतदान केल्यास त्यांच्या विजयाची शक्यता वाढणार आहे. तसेच याशिवाय बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाचे आणि इतर असे एकूण ६ आमदार आहेत. त्यांच्या भूमिकेचा परिणाम निकालावर दिसून येणार आहे.