परभणी : बीड जिल्ह्यातील वाढती गुन्हेगारी आणि जातीयवादाला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेसच्या राज्य शाखेच्या वतीने मस्साजोग ते बीड या सद्भावना यात्रेचे आयोजन दि.८ व ९ मार्च रोजी केले असून या सद्भावना यात्रेत परभणी जिल्ह्यातील नागरीक, तरूण, महिला, विद्यार्थी, साहित्यीक आणि सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींनी सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक व परभणी काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष सुहास पंडीत यांनी केले आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्या प्रकरणावरून बीड जिल्हा सध्या वाईट अर्थाने राज्यभरात गाजतो आहे. या प्रकरणात काही राजकीय पक्षांचे हितसंबंध गुंतले असल्याचा आरोप होत आहे. काँग्रेसने एक सामाजिक जबाबदारी म्हणून हा उपक्रम हाती घेतल्याचे सांगितले आहे. मस्साजोग ते बीड ६५ किमी अंतर असून ही सद्भावना यात्रा मस्साजोग येथून निघाल्यानंतर त्याच दिवशी रात्रीचा मुक्काम एका मठात होणार आहे.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या आदेशाने आणि जिल्हाध्यक्ष सुरेशराव वरपूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली परभणी येथील पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. सध्या दुषीत झालेले सामाजिक वातावरण बदलण्यासाठी व सामाजिक सलोखा आणि बंधुभाव पुर्नस्थापीत करण्यासाठी ही सद्भावना यात्रा असून या यात्रेत सहभागी व्हावे असे आवाहन समन्वयक सुहास पंडीत यांनी केले आहे.