21.9 C
Latur
Saturday, November 9, 2024
Homeमुख्य बातम्याहिमाचलमध्ये काँग्रेसची खेळी यशस्वी, सरकारला ३ महिने धोका नाही!

हिमाचलमध्ये काँग्रेसची खेळी यशस्वी, सरकारला ३ महिने धोका नाही!

सिमला : हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांच्या बंडामुळे सुखविंदर सिंह सुख्यू यांच्या नेतृत्वाखालील सरकार अडचणीत आले होते. मात्र आज सकाळी विधानसभा अध्यक्षांनी भाजपच्या १५ आमदारांना निलंबित केले आणि त्यानंतर आता अर्थसंकल्पही बहुमताने सादर करण्यात आल्याने सुख्यू यांच्या नेतृत्वाखालील सरकार कोसळण्याचा धोका पुढील ३ महिन्यांसाठी टळला आहे. त्यामुळे काँग्रेस सरकार जाणार असल्याचा दावा करणा-या भाजपला धक्का बसला.

हिमाचलमध्ये मंगळवारपासून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानावेळी काँग्रेसच्या सहा आमदारांनी क्रॉस वोटिंग केले. राज्याबाहेर गेलेले हे आमदार आज पुन्हा हिमाचल प्रदेशात आले. मात्र आमचा पाठिंबा भाजपला असल्याचे काँग्रेसच्या या नाराज आमदारांनी स्पष्ट केले. त्यामुळे काँग्रेस सरकार कोसळणार की काय, अशी चर्चा सुरू झाली होती.

मात्र विधानसभा अध्यक्षांनी आज गोंधळ घातल्याचा आरोप करत भाजपच्या तब्बल १५ आमदारांना निलंबित केले. त्यामुळे सभागृहातील भाजपची ताकद क्षीण झाली आणि याच संधीचा फायदा घेत मुख्यमंत्री सुख्यू यांनी अर्थसंकल्प सादर केला. त्यामुळे पुढील ३ महिन्यांसाठी मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्यू यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

दरम्यान, अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर विधानसभेचे कामकाज अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आले आहे.

बंडखोर आमदारांवर हल्ल्याचा प्रयत्न
विधानसभेच्या गेटवर आज सकाळी मोठा गोंधळ झाला. येथे काँग्रेस समर्थकांची मोठी गर्दी जमली. बंडखोर आमदार येताच काँग्रेस समर्थकांनी त्यांना विरोध करत गोंधळ घातला. विधानसभेच्या बाहेरील बॅरिकेड्स तोडण्यात आले. याशिवाय, या आमदारांच्या वाहनांवरही हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR