31.7 C
Latur
Saturday, May 11, 2024
Homeराष्ट्रीयजंगलात आढळले २०० गायींचे मृतदेह

जंगलात आढळले २०० गायींचे मृतदेह

मध्य प्रदेशात खळबळ

भोपाळ : भारतामध्ये ‘गो हत्या’ हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे. कारण, हिंदू धर्मीय गाईला मातेचा दर्जा देतात. मात्र, मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातल्या करैरा इथल्या जंगलात २०० हून अधिक गायींचे मृतदेह आढळले आहेत.
ही बातमी वा-याच्या वेगाने पसरली असून संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या सर्व मृत गायी शहरी भागातून इथे आणून टाकल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. एकाच वेळी शेकडो गायींचे मृतदेह आढळल्याने नागरिक गोंधळात पडले आहेत.

जिल्ह्याच्या उपविभागीय मुख्यालयापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या जंगलात हे २०० हून अधिक गायींचे मृतदेह आढळले आहेत. एकाच वेळी शेकडो गायींचा मृत्यू कसा झाला, याबाबत कोणालाच काहीही कल्पना नाही. या गायी शहरी भागातून जंगलात आणून सोडल्याचा दावा पशुसंवर्धन विभागाने केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यानंतर या गायींचा मृत्यू कसा झाला हे समजेल.
करैरा येथील जुझाई ग्रामपंचायत हद्दीतील महामार्गापासून अवघ्या ५०० मीटर अंतरावर पाच ते सहा ठिकाणी या मृत गायी आढळल्या आहेत.

दोनशेहून अधिक मृत गायींच्या पोटातून पॉलिथिनचा कचरा बाहेर पडत आहे. यावरून या सर्व गायी कोणी तरी शहरी भागातून जंगलात आणून सोडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. करैरापासून ५० किमी अंतरावर यूपीतल्या झाशी शहराची सीमा आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पशुसंवर्धन विभागाने घटनास्थळी आपले कर्मचारी पाठवले. विभागाकडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

आसपास राहणा-या लोकांनी ही गुरे येथे फेकली असावीत, असं पोलिसांचे म्हणणे आहे; पण पंचक्रोशीतले नागरिक असं का करतील, या प्रश्नाचं उत्तर पोलिसांकडेही नाही. ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे, की हे कृत्य एक-दोन व्यक्तींना शक्य नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात गायींचे मृतदेह आढळण्याशी पंचक्रोशीतल्या रहिवाशांचा काहीही संबंध नाही, असा दावा स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे. मृत गायींची संख्या बघता शासनाने या प्रकरणाची सविस्तर चौकशी केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR