नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ आल्यामुळे राजकारण तापले आहे. आधी आम आदमी पार्टी आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप पाहायला मिळत होते, पण आता यात काँग्रेसने उडी घेतली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल(दि.१३) आपल्या सभेतून केजरीवालांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली आणि खोटे बोलण्यात दोन्ही सारखेच असल्याची टीका केली होती.
दरम्यान, आता अरविंद केजरीवालांवर थेट टीका करण्याच्या सूचना राहुल गांधींनी सर्व उमेदवार आणि काँग्रेस नेत्यांना दिल्या आहेत. काँग्रेस आणि आम आदमी पार्टी सुमारे ७ महिन्यांपूर्वी इंडिया आघाडी अंतर्गत लोकसभा निवडणूक एकत्र लढवत होते. पण, पुढे हरयाणा विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगळे झाले. तसेच, अरविंद केजरीवालांनी दिल्ली विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची घोषणा केली. त्यामुळे आता दिल्लीत तीन पक्ष समोरासमोर आले आहेत.
अशातच, काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी थेट अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल आले आणि दिल्ली स्वच्छ करू, भ्रष्टाचार मिटवू, पॅरिस बनवू, अशी आश्वासने दिली. आता परिस्थिती भीषण आहे, प्रदूषण विकोपाला गेले आहे. लोक घराबाहेर पडत नाहीत. खोटी आश्वासने देण्यात नरेंद्र मोदी आणि अरविंद केजरीवाल सारखेच आहेत अशी टीका राहुल गांधींनी केली होती.
केजरीवालांचा पलटवार
या टीकेनंतर काही वेळातच केजरीवाल यांनी वर एक पोस्ट लिहिली होती. आज राहुल गांधी जी दिल्लीत आले. त्यांनी मला खूप शिव्या दिल्या. पण मी त्यांच्या वक्तव्यावर भाष्य करणार नाही. त्यांची लढाई काँग्रेसला वाचवण्यासाठी आहे, माझी लढाई देश वाचवण्यासाठी आहे असा पलटवार केजरीवालांनी केला.