20.9 C
Latur
Thursday, November 28, 2024
Homeराष्ट्रीयपरीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन

परीक्षांमधील गैरप्रकारांविरोधात काँग्रेस करणार देशव्यापी आंदोलन

नवी दिल्ली : आधी नीट आणि नंतर नेट परीक्षेतील गैरप्रकारांबाबत काँग्रेस सातत्याने मोदी सरकारवर हल्लाबोल करीत असून या मुद्यावरून काँग्रेस देशभरात आंदोलन करणार आहे. काँग्रेस पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते देशातील अनेक ठिकाणी आंदोलन करणार असल्याची माहिती काँग्रेसच्या वतीने देण्यात आली आहे. मध्य प्रदेशातील नीट, नर्सिंग घोटाळा, विविध परीक्षांमधील पेपरफुटी याप्रकरणी भोपाळमध्ये काँग्रेस पक्ष आंदोलन करणार असून दिग्विजय सिंह, जितू पटवारी यांच्यासह अनेक नेते या निदर्शनात सहभागी होणार आहेत. देशातील इतर राज्यांतही काँग्रेस आंदोलन करणार आहे.

काँग्रेस नेते शशी थरूर यांनी पेपरफुटीला हास्यास्पद म्हटले आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी मोदी सरकारवर जोरदार हल्ला चढवला होता. भारतात सातत्याने पेपर लीक होत आहेत आणि नरेंद्र मोदी हे थांबवू शकत नाहीत किंवा थांबवू इच्छित नाहीत असे राहुल गांधी म्हणाले. भाजपशासित राज्ये ही पेपरफुटीची केंद्रे आणि शिक्षण माफियांची प्रयोगशाळा बनली आहेत. भाजप सरकार शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करून तरुणांच्या भवितव्याशी खेळत आहे. इंडिया आघाडी हे कधीही होऊ देणार नाही, असेही राहुल गांधी म्हणाले आहेत.

आतंरराष्ट्रीय हल्ले थांबविणा-यांनी पेपरफुटी थांबवावी
पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना राहुल गांधी म्हणाले की, पंतप्रधान मोदी रशिया-युक्रेन, इस्रायल-गाझा युद्ध थांबवतात, पण पेपर लीक थांबवू शकत नाहीतकिंवा थांबवू इच्छित नाहीत. भाजप आणि आरएसएसच्या लोकांनी शैक्षणिक संस्था ताब्यात घेतल्याचा दावाही राहुल गांधी यांनी केला. ही परिस्थिती बदलल्याशिवाय पेपरफुटी थांबणार नाही असेही गांधी म्हणाले.

विद्यार्थी देशाचे भविष्य
पेपरफुटीच्या मुद्द्यावर शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी ते म्हणाले होते की, विद्यार्थी हे देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्यांचे कल्याण हे आमचे प्राधान्य आहे. याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. जे काही समोर आले आहे, त्याचा तपास सुरू आहे. शिक्षणमंत्री या नात्याने मी या प्रकरणाची नैतिक जबाबदारी घेतो. आम्ही सुधारणेसाठी तयार आहोत. कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR