नवी दिल्ली : अमेरिकी शॉर्ट सेलिंग कंपनी ‘हिंडेनबर्ग रिसर्च’ने ‘सेबी’च्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे अदानी समुहाशी असलेल्या व्यावसायिक संबंध उघड केल्याची संयुक्त संसदीय समिती (‘जेपीसी’) द्वारे चौकशी करण्यात यावी, या मागणीचा पुनरुच्चार करून येत्या २२ ऑगस्टला देशातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयांना काँग्रेसतर्फे घेराव घालण्यात येणार आहे.
काँग्रेसचे महासचिव, प्रभारी व प्रदेशाध्यक्षांची बैठक आज दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हेही उपस्थित होते. या बैठकीत नुकताच उघडकीस आलेला हिंडेनबर्ग अहवालाचा मुद्दा चर्चिला गेला. हिंडेनबर्गवरून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घेरण्याचा प्रयत्न काँग्रेसतर्फे केला जाणार आहे. या अहवालाने देशातील सेबीसारखी प्रख्यात नियामक संस्थेने अदानी समुहाशी तडजोड केल्याचे स्पष्ट झाले असून हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशीर्वादाशिवाय होऊ शकत नाही. या घोटाळ्यात पंतप्रधान मोदी सामील असल्याचे थेट आरोप करण्यात आला. सेबीच्या प्रमुख माधबी पुरी बुच यांचे हितसंबंध गुंतल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांना तत्काळ बरखास्त करण्याची मागणी यावेळी काँग्रेसने केली आहे. या बैठकीत संमत झालेल्या ठरावांची माहिती काँग्रेसचे संघटन महासचिव खासदार के.सी. वेणुगोपाल यांनी पत्रकारांना दिली.
जातीनिहाय जनगणना व्हावी
काँग्रेसच्या आजच्या बैठकीत जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी लावून धरली. गेल्या १३ वर्षांपासून जनगणना झाली नाही. यामुळे अनेकांना आपल्या घटनात्मक अधिकारापासून वंचित राहावे लागत आहे.असे यावेळी खर्गे यांनी म्हटले आहे.
आरक्षणासाठी समिती गठीत
अनुसूचित जाती व जमातींना आरक्षण देण्यासाठी क्रिमीलेअरच्या निर्णयाचा अभ्यास करण्यासाठी काँग्रेस पक्षाने एक समिती गठीत केली आहे. ही समिती सर्व राज्यांच्या प्रदेशाध्यक्ष व प्रत्येक राज्यातील अनुसूचित जाती-जमातीच्या नेत्यांशी चर्चा करून निर्णय घेणार आहे.