22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeमहाराष्ट्रमहाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही

महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा प्रयत्न काँग्रेस खपवून घेणार नाही

नाना पटोले यांचा इशारा

मुंबई : धारावीची सर्व जमीन अदानींना देण्याचा सरकारचा निर्णय आहेच, पण वरळीतील दूध डेअरीची कोट्यवधी रुपयांची जमीनही स्वस्तात देण्याचा प्रयत्न सुरु आहे. मुंबईतील सर्व जमिनीचे अधिकारच अदानींना देण्याचे निर्देश नरेंद्र मोदी सरकारच्या माध्यमातून राज्य सरकारला येतात व महाभ्रष्ट युती सरकार त्याचे पालन करत आहे. पण कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र व महाराष्ट्राचा स्वाभिमान गुजरातला विकू देणार नाही, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ठणकावून सांगितले.

अदानींबाबतच्या प्रश्नावर पत्रकांशी बोलताना नाना पटोले म्हणाले, अदानींच्या धारावी प्रकल्पाबद्दल काँग्रेस पक्षाने आधीच भूमिका स्पष्ट केलेली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही या मुद्यावर भूमिका जाहीर केलेली आहे परंतु भाजपा सरकार मात्र मुंबईतील महत्वाचे व मोक्याचे भूखंड अदानीच्या घशात घालत आहे. धारावी पुनर्वसन प्रकल्पाचे टेंडर दुबईच्या एका कंपनीला मिळाले होते पण नंतर ते रद्द करुन अदानीला देण्यात आले. महायुती सरकार हे गुजरातच्या इशा-यावर चालत आहे.

मुंबईसह महाराष्ट्र गुजरातला विकण्याचा भाजपा प्रणित शिंदे सरकारचा प्रयत्न काँग्रेस कदापी खपवून घेणार नाही. राज्यातील जनतेत महायुती सरकारच्या या गुजरात धार्जीणेपणाबद्दल प्रचंड विरोध आहे. महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे म्हणून जे कार्यक्रम केला पण ही वाघनखे महाराजांची नाहीत. इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत यांनी लंडन म्युझियमला पत्र पाठवून त्याची माहिती घेतली असता म्युझियमने ते स्पष्ट केले आहे असे असतानाही महायुती सरकारने जनतेचा पैसा खर्च करून सोहळा केला. ज्या लोकांनी अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक बांधण्याचे जाहीर करुन २०१७ मध्ये जलपूजनही केले ते स्मारक अजून झालेले नाही.

हेच लोक शिवाजी महाराजांचा अपमान करण्यात सर्वात पुढे होते. या लोकांनी छत्रपतींचा मानाचा जिरेटोपही नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर बसवून शिवाजी महाराजापेंक्षा नरेंद्र मोदी श्रेष्ठ आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. जगात अनेक राजे झाले पण छत्रपतीपद फक्त शिवाजी महाराजांचेच आहे. निवडणुकीच्या तोंडावर छत्रपतींच्या नावाने नकली वाघनखे आणून त्याचे प्रदर्शन करण्याचा महाभ्रष्टयुती सरकार अयशस्वी प्रयत्न करत आहे असेही काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने लाडकी बहिण योजना आणली आहे. १० वर्षापासून महागाईच्या आगीत होरपळणा-या भगिनींना १५०० रुपये देण्याची घोषणा केली आहे. काँग्रेस पक्षाच्या योजनांची नावे बदलून त्या राबवल्या जात आहेत. विविध योजना काँग्रेस सरकारने आणल्या व जनतेला त्याचा लाभ दिला असे नाना पटोले म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR