24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयकाँग्रेस आता क्राऊड फंडिंग सुरू करणार

काँग्रेस आता क्राऊड फंडिंग सुरू करणार

‘डोनेट फॉर देश’ मोहिमेद्वारे देणग्या गोळा करणार केसी वेणुगोपाल यांची माहिती

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीच्या काही महिन्यांपूर्वी ऑनलाइन देणग्या गोळा करण्यासाठी काँग्रेसने डोनेट फॉर देश नावाची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाचे संघटन सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी सांगितले की, १८ डिसेंबरला या मोहिमेची सुरुवात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे करणार आहेत. दरम्यान, २८ डिसेंबरला आपल्या स्थापना दिनापूर्वी देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस लोकांना या मोहिमेद्वारे १३८ रुपये, रुपये १,३८०, रुपये १३,८०० किंवा १० पट रक्कम देणगी म्हणून देण्याचे आवाहन करेल.

वेणुगोपाल यांनी पत्रकारांना सांगितले की काँग्रेसला आपली ऑनलाइन निधी उभारणी मोहीम डोनेट फॉर देश सुरू करण्याची घोषणा करताना अभिमान वाटतो. हा उपक्रम महात्मा गांधींच्या १९२०-२१ मधील ऐतिहासिक ‘टिळक स्वराज फंड’ पासून प्रेरित आहे. तसेच, संसाधने आणि संधींच्या समान वितरणासह समृद्ध भारत निर्माण करण्यासाठी पक्षाला सक्षम बनविण्याचे उद्दिष्ट आहे. आम्ही लोकांना त्या इतिहासाची कबुली देऊन योगदान देण्यास आमंत्रित करतो, जो चांगल्या भारतासाठी पक्षाच्या कायम वचनबद्धतेचे प्रतीक आहे असे वेणुगोपाल यांनी सांगितले.

वेणुगोपाल यांच्या म्हणण्यानुसार, प्रदेश काँग्रेस कमिटी आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून या मोहिमेबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. ते म्हणाले ही मोहीम प्रामुख्याने पक्षाच्या स्थापना दिवस २८ डिसेंबरपर्यंत ऑनलाइन असणार आहे. त्यानंतर आम्ही अभियान सुरू करू. या अंतर्गत पक्षाशी संबंधित स्वयंसेवक घरोघरी जाऊन प्रत्येक बूथमधील किमान १० घरांना लक्ष्य करतील आणि प्रत्येक घरातून किमान १३८ रुपयांचे योगदान सुनिश्चित करतील.

काँग्रेसचा स्थापना दिवस यंदा नागपुरात
काँग्रेसचा स्थापना दिन सोहळा २८ डिसेंबरला नागपुरात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने नागपुरात काँग्रेस पक्षातर्फे मोठी रॅलीही आयोजित केली जाणार असून त्यात पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते सहभागी होणार आहेत. या रॅलीच्या माध्यमातून काँग्रेस आगामी लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या रॅलीमध्ये १० लाखांहून अधिक लोक सहभागी होणार आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR